
डॉ. दुर्भाटकर यांना मुदतवाढ देणार ः मंत्री दीपक केसरकर
डॉ. दुर्भाटकर यांना मुदतवाढ
देणार ः मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी ः सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत; मात्र त्यांना आणखी एक वर्ष सावंतवाडी रुग्णालयातच मुदतवाढ दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव आपण दिला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. दुर्भाटकर चांगले काम करत आहेत. या रुग्णालयात चांगली सेवा उपलब्ध व्हावी म्हणून सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ३१ मेपूर्वी डॉ. दुर्भाटकर यांना जादा एक वर्ष सेवा करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला जाणार आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला स्थगितीही घेतली जाईल. डॉ. दुर्भाटकर हे या रुग्णालयात आणखी एक वर्ष जादा काम करणार आहेत, असे स्पष्ट केले.
-----------------------
सावंतवाडी येथे
कॅरम प्रशिक्षण
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन मार्फत कॅरम खेळामधे करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी तीन वेळचे विश्वविजेते योगेश परदेशी यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनाखाली १ ते ६ जून या कालावधीत कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. या कॅरम प्रशिक्षण शिबिराचा लाभ जिल्ह्यातील उदयोन्मुख कॅरम खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनतर्फे केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सेक्रेटरी योगेश फणसळकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
--
कासमध्ये आज
धार्मिक कार्यक्रम
बांदा ः कास येथील श्री देवी माऊली आणि रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन सोहळा २७ ते २९ मे दरम्यान साजरा केला जाणार आहे. यानिमित्त गोवा फ्रेंड्स सर्कल व कास ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतील. उद्या (ता.२७) सकाळी धार्मिक विधी, महाप्रसाद, संध्याकाळी ग्रामस्थांतर्फे भजन तर रात्री खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. रविवारी सकाळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, संध्याकाळी निमंत्रितांसाठी भजन स्पर्धा होणार आहे. सोमवारी सकाळी रांगोळी स्पर्धा, दुपारी श्री सत्यनारायण महापूजेनंतर महाप्रसाद, संध्याकाळी ग्रामस्थांतर्फे भजन, रात्री बक्षीस वितरण कार्यक्रम होईल. त्यानंतर ''ब्रह्मपातकी काळभैरव'' या दशावतारी नाटकाचे सादरीकरण केले जाईल. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.