
छायाचित्रकारांनी केली वायंगणी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता
२६ (पान २ साठी)
-rat२६p१४.jpg-
२३M०५११७
रत्नागिरी ः वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सनी कचरा गोळा करून स्वच्छता केली.
-----------
छायाचित्रकारांकडून वायंगणी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता
रत्नागिरी, ता. २६ : शहराजवळील वायंगणी या अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्या, कचरा साचल्याने अस्वच्छता पाहायला मिळाली. याची दखल रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सनी घेतली आणि दोन तास श्रमदान करून किनाऱ्याची स्वच्छता केली. सामाजिक बांधिलकी म्हणून छायाचित्रकारांनी स्वतःहून पुढाकार घेत हा उपक्रम राबवला. यात सुमारे ३५ पिशव्यांतून कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
रत्नागिरीतील छायाचित्रकार बऱ्याचदा प्रीवेडिंग फोटोग्राफीसाठी समुद्रकिनारी जातात; पण खूपवेळा समुद्रकिनारी कचरा गोळा झालेला दिसतो. मानवी कृतीतून समुद्रात किंवा समुद्रकिनारी अस्वच्छता पसरवली जाते. त्यामुळे समुद्राचे पाणी हे दूषित होऊन त्याचा परिणाम हा जलचरांवर होत आहे. समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, बॉटल, खाद्यपदार्थांचे आवरण टाकून अस्वच्छता पसरवण्यात येते. त्यांची स्वच्छता करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर ही स्वच्छता करण्यात आली.
सकाळी ६ ते ८ या वेळेत स्वच्छता करण्यात आली. याकरिता ३० छायाचित्रकारांनी मेहनत घेतली. ३५ पिशव्यांतून सुमारे दोनशे ते अडीचशे किलो कचरा गोळा करण्यात आला. सर्व छायाचित्रकार समुद्रकिनाऱ्याचा वापर करत असल्याने आपले कर्तव्य म्हणून छायाचित्रकारांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या उपक्रमाकरिता ग्रामपंचायत सरपंच मिताली भाटकर, उपसरपंच जिगरमियाँ पावसकर, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर आणि सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.