खेड ः सापिर्ली एसटी बस अर्ध्या रस्त्यातूनच माघारी बोलवली

खेड ः सापिर्ली एसटी बस अर्ध्या रस्त्यातूनच माघारी बोलवली

सापिर्लीची एसटी अर्ध्या रस्त्यातूनच माघारी बोलवली

मुख्यमंत्री दौऱ्याचे कारण; प्रवाशांचे अतोनात हाल

खेड, ता. २६ ः मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याची झळ खेड तालुक्यातील खेड-सापिर्ली बसमधील प्रवाशांना सोसावी लागली. खेड स्थानकातून सायंकाळी ५ वा. सोडलेली बस अर्ध्यावर जाऊन पुन्हा आगारात बोलावून घेण्यात आली. प्रवाशांच्या संतप्त भूमिकेनंतर पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही बस सोडण्यात आली. संतप्त प्रवाशांनी या कारभाराविषयी लेखी तक्रार केली आहे. रत्नागिरीत साहित्य घेऊन बस पाठवायची असल्याचे कारण सांगून बस बोलावून घेण्यात आली.
खेड बसस्थानकातून दररोज ४ वा. सुटणारी खेड-सापिर्ली बस (एमएच-१४-बीटी-३००२) ही बुधवारी एक तास उशिरा सायं. ५ वा. सोडली. बस घेऊन जात असताना खेड येथून भरणेनाक्याच्या दिशेने निघालेली बस अचानक चालकाला फोन करून पुन्हा बसस्थानकात बोलावून घेतली. सुमारे दोन किमी अंतर गेलेली बस पुन्हा स्थानकात आणल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यानंतर तब्बल दोन तास बस स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. काही प्रवाशांनी चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आले की, तहसीलदार यांच्या कार्यालयातील काही साहित्य रत्नागिरी येथे या बसने उद्या न्यायचे आहे. त्यामुळे अचानक बस परत बोलावण्यात आली. वरिष्ठ पातळीवरून अचानक आदेश आल्याची माहिती खेड आगारातून प्रवाशांना देण्यात आली. या कारभाराचा जाहीर निषेध केला व तसे निवेदन आगारप्रमुख यांना दिले. सुमारे पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही बस सोडण्यात आली. प्रवाशांचे हाल कशासाठी? जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी गौतम तांबे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com