
ट्रकमध्ये दर्शनी कोळसा, आतमध्ये गोवा बनावटीची दारू
41 (पान 3 साठी)
- ratchl264.jpg ः
23M05187
चिपळूण ः राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेला गोवा बनावटीचा दारूसाठा.
ट्रकमधून कोळशाआड मद्याची वाहतूक
९२ लाखांचा मुद्देमाल जप्त ; वालोपे येथे कारवाई
चिपळूण, ता. 26 ः ट्रकमध्ये कोळसा असल्याचे दाखवून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर चिपळुणातील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. या ट्रकमध्ये दर्शनी भागात कोळसा होता तर आतमध्ये दारूचे बॉक्स होते. वालोपे येथे चिपळूण रेल्वेफाट्याजवळ सापळा रचून ट्रकला पकडण्यात आला. सुमारे एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी नाके व गस्ती मोहीम राबवण्यात आली. पथक वालोपे येथे गस्त घालत असताना गोव्याहून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार वालोपे येथे चिपळूण रेल्वेस्टेशन फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. गुरूवारी (ता. 25) मे रोजी सायंकाळी चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना एक संशयित पांढऱ्या रंगाच्या ट्रकची झडती घेतली. ट्रकच्या हौद्यामध्ये मागच्या बाजूस सुमारे 20 किलोच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण 125 पॉलिथिन गोण्या आढळल्या. या गोणींच्या आड कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स दिसले. या बॉक्सची तपासणी केली असता मद्याचे एकूण 950 बॉक्समध्ये 11 हजार 400 कंपनी सीलबंद बाटल्या आढळल्या. या विदेशी मद्याची अंदाजे किंमत 68 लाख 40 हजार आहे. तर 24 लाखाचा ट्रक, 12 हजार 500 रुपयाची कोळसा पावडर, 10 हजाराचा विवो कंपनीचा एक मोबाईल असा 92 लाख 62 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या मद्याचे उत्पादन हे गोवा राज्यातच झाले आहे. या कारवाईत ट्रकचालक सुरेश हरिबा पाटील (रा. शिवाजीनगर, कडेगाव जि. सांगली) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 90, 81 व 83 अन्वये गुन्हा दाखल केला.
या अवैध विदेशी मद्याच्या वाहतुकीमागील मुख्य सुत्रधार सुरेश पाटीलचा पुतण्या ओंकार हणमंत पाटील (रा. मलकापूर, ता. कराड, जि.सातारा) हा सर्व व्यवहार करत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क चिपळूणचे निरीक्षक व्ही. एस. मासमार, दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, राजेंद्र भालेकर तसेच जवान सावळाराम वड यांनी सहभाग घेतला. तुषार शिवलकर व सिद्धार्थ जाधव यांनी कारवाईकामी मदत केली. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक व्ही. एस. मासमार करत आहेत.