
कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा
पान एक
५२८१
कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा
---
२१ लाखांचा मुद्देमाल; जिल्हाभरातील १२ जणांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः शहरातील मुडेश्वर मैदान परिसरातील माळरानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आज कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या १२ जणांना ताब्यात घेतले; तर उर्वरित २० ते २५ जण पळून गेले. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई केली. यात तीन मोटार, तीन दुचाकींसह एकूण २१ लाख २१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. छाप्यात २४ हजार ३७० रुपयांची रोकड, एक लाख सात हजार रुपये किमतीचे मोबाईल आणि १९ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चारचाकी आणि दुचाकी यांचा समावेश आहे. जुगार अड्ड्यावर सापडलेल्या १२ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कणकवली पोलिसांना मुडेश्वर मैदान परिसरातील माळरानावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. पहाटे अडीचच्या सुमारास कणकवली-नागवे रस्त्यावर वाहने थांबवून पोलिस पथकाने माळरानावर जाऊन जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर छापा टाकला. अचानक पोलिसांचा छापा पडताच तेथील २० ते २५ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले; तर १२ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. कारवाईत जयवंत आत्माराम बाईत (वय ४९, रा. तेलीआळी, कणकवली, ता. कणकवली), सिद्धेश भास्कर ठाकूर (३९, रा. कलमठ, लांजेवाडी, ता. कणकवली), संतोष बाळकृष्ण कुडतरकर (५०, रा. माणगाव बाजारपेठ, ता. कुडाळ), विशाल वासुदेव सावंत (४५, रा. वैश्यवाडा, सावंतवाडी, ता. सावंतवाडी), केतन रावजी ढोलम (३५, रा. कोळंब आडारीवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. अंधेरी (पूर्व), मुंबई), महेश गंगाधर जोगी (३२, रा. मालवण बाजारपेठ, ता. मालवण), कुलराज भगवान बांदेकर (२२, रा. जोशीवाडा, मालवण, ता. मालवण), शुभम कृष्णकांत मिठबावकर (२२, रा. मालवण हडी, ता. मालवण), रोहन जितेंद्र वाळके (२९, रा. देऊळवाडा, मालवण, ता. मालवण), हेमराज प्रकाश सावजी (३०, रा. वायरी भुतनाथ, ता. मालवण), विनायक शशिकांत शिर्के (४२, रा. कलमठ गोसावीवाडी, ता. कणकवली) आणि साहिल उमेश आचरेकर (२१, रा. मालवण दांडी, ता. मालवण) यांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीही कणकवली पोलिसांनी याच ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता.