सदर ः संगमेश्वरचे बसस्थानक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः संगमेश्वरचे बसस्थानक!
सदर ः संगमेश्वरचे बसस्थानक!

सदर ः संगमेश्वरचे बसस्थानक!

sakal_logo
By

आख्यायिकांचे आख्यानः लोगो

rat२७p६.jpg
०५३३२
जे. डी. पराडकर
rat२७p७.jpg
M०५३३३
संगमेश्वर बसस्थानक

संगमेश्वरचे बसस्थानक !

इंट्रो

ग्रामीण भागातील नागरिकांचे आवडते वाहन म्हणजे लालपरी! आजही ग्रामीण भागातून अन्य वाहने डोळ्यासमोरून जात असताना लालपरीची वाट पाहणारे प्रवासी म्हणजेच ''विश्वास'' असे म्हणायला पाहिजे. सुरक्षित घरापर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी करत असतात. सुमारे ६० वर्षापूर्वी उभारलेले संगमेश्वर येथील राज्य परिवहन मंडळाचे बसस्थानक हे मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्वाचे आणि मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते; मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात आता पूर्वीपेक्षा होणाऱ्या वाढीव भूसंपादनामुळे या बसस्थानकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमेश्वर बसस्थानकात एकदा आलेल्या प्रत्येक प्रवाशाचे आत्मियतेचे नाते जुळलेले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे निवासस्थान असलेला संगमेश्वर येथील एक वृक्ष लवकरच जमिनदोस्त होणार असल्याची कहाणी पहिल्या भागात वाचली. आजच्या दुसऱ्या भागात आपण संगमेश्वरच्या बसस्थानकाचा आढावा घेणार आहोत.
-----
मुंबई-गोवा या दोन्ही बाजूच्या अंतराला संगमेश्वर बसस्थानक हे मध्यवर्ती म्हणून आजवर ओळखले गेले. कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या बसची संख्या काहीशी कमी झाली असली तरी आजही दिवसभरात जवळपास १०० बसफेऱ्यांची ये-जा या बसस्थानकातून होत असते. अन्य बसस्थानकांप्रमाणे येथेही पेपर स्टॉल, रसवंती गृह, पॉपकॉर्न आणि फळांचे स्टॉल आहेत. तालुक्यातील असंख्य नागरिकांची प्रवासाच्या निमित्ताने या बसस्थानकात आजही मोठी वर्दळ असल्याचे पाहायला मिळते. खरंतर, पूर्वीपासूनच या बसस्थानकासाठी असणारी जागा मर्यादित आहे. परिणामी, हंगामात जागेअभावी येथे बस लावणे म्हणजे चालकांचे मोठे कौशल्य असते. या बसस्थानकात येणारे प्रवासी बसस्थानकाजवळ खूप जुने नाते असल्याप्रमाणे येथे वावरत असतात. येथील गर्दीत कितीही धावपळ असली तरी कोणी ना कोणी ओळखीचे दिसते आणि मोठ्या आवाजात त्याला हाक मारून त्याचे लक्ष वेधले जाते. या भेटीनंतर खुळखूळ आवाज येणाऱ्या रसवंती गृहाकडे पावले वळतात आणि काही काळ या गप्पा खुळखुळ्यांच्या आवाजातही रंगतात. संगमेश्वर बसस्थानकातील राजू बालवडकर यांचे कानिफनाथ रसवंती गृह म्हणजे लगबगीचे महत्वाचे केंद्र. ऊस पिळणाऱ्या येथील मशिनपेक्षा येथील रस काढणाऱ्या कामगारांची लगबग खूप मोठी असते. बसची वाट पाहात असणाऱ्या अनेक प्रवाशांचा वेळ, रसवंती गृहातील ही लगबग पाहण्यातच निघून जातो.
संगमेश्वरच्या बसस्थानकात उभारणीपासून वाचकांची सेवा करणारे (कै.) रंगनाथ आणि आता महेश खातू यांचे प्रवाशांजवळ अनेक वर्षांचे नाते आहे. येथे येणारा ग्राहक हा नेहमीच गडबडीत असल्याने पेपर देणाऱ्या माणसाला नेहमीच सतर्क राहावे लागते. कोणत्या वाचकाला कोणता पेपर हवा असतो हे (कै.) रंगनाथ आणि आता महेश याला जणू पाठ झालेले आहे. पहाटे बसस्थानकात सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत सुरूच असते; मात्र वेळेनुसार या लगबगीत बदल होत जातो. संगमेश्वरच्या बसस्थानकावरील २४ तासात होणाऱ्या हालचाली काही प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना पाठ झाल्यासारख्या आहेत. बसस्थानकातील उपहारगृह हा प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांच्या उठण्या-बसण्याचा जणू अड्डाच. लांब पल्ल्याच्या बसमधील ग्रामीण भागातील प्रवासी डबा घेऊन येतात. या प्रवाशांना डबा खाण्यासाठी उपहारगृहात स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. अन्य बसस्थानकातील उपहारगृहे विविध कारणांनी बंद पडली तरीही संगमेश्वरचे एसटी उपहारगृहे भोजने बंधू मोठ्या मेहनतीने आणि दर्जेदार पद्धतीने चालवत आहेत, ही कौतुकास्पद बाब म्हटली पाहिजे.
बसस्थानकातील पानपट्टी हा अनेकांच्या आवडीचे ठिकाण. संगमेश्वर बसस्थानकातील पानपट्टी कै. नाना शेट्ये चालवायचे. नानांची पानपट्टी दिसायला छोटी होती; मात्र अलिबाबाच्या गुहेप्रमाणे ते यातून माल काढून देत. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येकाची कुंडलीच नानांना माहित होती. नानांच्या पश्चात त्यांचा मुलगा राजू यानेदेखील तेवढ्याच आत्मियतेने ही पानपट्टी चालवली; मात्र राज्य परिवहन मंडळाचे पानपट्टीबाबत नियम बदलले आणि राजूला नाइलाजाने पानपट्टी बंद करावी लागली. जवळपास ५० वर्षांनंतर नानांची पानपट्टी आहे त्याच जागेवर गतकाळातील वैभवाची एक मूक साक्षीदार म्हणून उभी आहे. ''पॉपकॉर्न'' आणि बसस्थानक यांचे नाते जणू जन्मोजन्मीचे. संगमेश्वर बसस्थानकात पॉपकॉर्नचा स्टॉल चालवला तो लोवले गावातील (कै.) नाना शिंदे यांनी. पॉपकॉर्न तयार करताना उडणाऱ्या लाह्या आणि सुटणारा खमंग वास, प्रवाशांना या स्टॉलपर्यंत खेचत आणतो. लांब पल्ल्याच्या बसमधून धावत धावत प्रवासी पॉपकॉर्न घेण्यासाठी आवर्जून नानांच्या स्टॉलवर यायचे. महाविद्यालयीन युवक बसने जायचे नसले तरी बसस्थानकात ठराविक वेळी का येतात? याचे अनुभव बसस्थानकातील प्रवाशांनी अनेकदा घेतलेले असतात. कोणत्या बसने कोण येतो आणि कोणत्या बसने कोण जातो याची माहिती असणारे कॅमेरे बसस्थानकात पूर्वीपासून बसलेले आहेत. बसस्थानकात सेवेत असणारे वाहतूक नियंत्रक त्यांच्या उद्घोषणेच्या आवाजावरून ओळखणारे प्रवासी आहेत. यावरूनच प्रवाशांचे परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांजवळ किती जिव्हाळ्याचे आणि खोलवर नाते जुळले असेल याची अनुभूती येते. उद्घोषणा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आवाजाची लकब हृदयापर्यंत पोहोचणे हे एक अनामिक नातेच. या बसस्थानकात पूर्वी सेवा दिलेले अनेक वाहतूक नियंत्रकांचे प्रवाशांजवळ नात्यापलीकडील ऋणानुबंध होते. बसस्थानकात सामानाची चढउतार करणारे (कै.) गुरव, पांडू, दत्ता यांच्यादेखील प्रवाशांच्या मनात खूप वेगळ्या आठवणी आहेत. त्यांना विसरलं तर, संगमेश्वर बसस्थानकाचा इतिहास पूर्णच होणार नाही. बसस्थानक रात्रीच्यावेळी जणू धर्मशाळेचे काम करते. बस चुकलेल्या अथवा फिरस्त्या मंडळींसाठी बसस्थानक हे एक हक्काचे ठिकाण असते.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना संगमेश्वर येथे पूर्वी ४५ मीटरचे भूसंपादन केले गेले होते. या वेळी संगमेश्वर बसस्थानकाच्या विहिरीपर्यंतचा भाग रूंदीकरणात जात होता. असे असले तरी उर्वरित भागात बसस्थानक कसेबसे चालवता आले असते; मात्र संगमेश्वर येथे नव्याने ४५ ऐवजी ६० मीटरने भूसंपादन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आणि यामध्ये संगमेश्वर बसस्थानकाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी ५० फूट जागा चौपदरीकरणात गेली तर बसस्थानकाला पुढील बाजूला बस उभ्या करण्यास जागाच शिल्लक रहाणार नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. बसस्थानकाच्या देवरूखकडील बाजूस असणाऱ्या जागेत बसची जा-ये होऊ शकणार नाही. त्यामुळे आता संगमेश्वर बसस्थानकाचे स्थलांतर करण्याची वेळ आली तर ते जागेअभावी करायचे कोठे? असा प्रश्न राज्य परिवहन मंडळासमोर उभा राहिला आहे. भविष्यात जर संगमेश्वर बसस्थानक छोटे-छोटे करत एखाद्या प्रवासीमार्ग निवाऱ्याएवढेच राहिले तर प्रवाशांना केवळ जुन्या आठवणीच जागवत बसावे लागणार आहे. आठवणींच्या पाऊलखुणांत संगमेश्वर बसस्थानकाचा समावेश होऊ नये असे वाटत असेल तर केवळ हे वाटणं बसस्थानक वाचवू शकणार नाही. त्यासाठी काहीतरी निर्णायक कृती करावी लागेल. योग्य दिशेने पावली टाकली तर काहीतरी मार्ग निघेल या आशेवर काही प्रवासी अजूनही तग धरून आहेत. बसस्थानक आहे त्या जागेवरून स्थलांतरित करणे ही कल्पनाच सहन न होणारी आहे. याबरोबरच बसस्थानकासाठी अन्यत्र जागा उपलब्ध नाही, ही मोठी अडचण आहेच.
सद्यःस्थितीत बसस्थानकाची डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. बसस्थानक इमारतीचे गळणारे पत्रे बदलणे, रंग काढणे, नादुरुस्त पंखे बदलणे, पेवरब्लॉक दबून पडलेले दोन मोठे खड्डे भरणे आवश्यक बनले आहेत. ६० मीटरने भूसंपादन झाले तर सध्या असणारी बसस्थानकाची इमारत कमी करावी लागणार आहे. परिणामी, बसस्थानकाची डागडुजी करण्यापूर्वी वाढीव भूसंपादनाकडे लक्ष ठेवणे महत्वाचे ठरणार आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मात्र बसस्थानकाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे समजल्यापासून हळहळ वाटू लागली आहे. संगमेश्वरवासीयांनी ६० मीटरने भूसंपादन करण्यास मोठा विरोध केला आहे. जर ६० ऐवजी ४५ मीटर एवढेच भूसंपादन राहिल्यास संगमेश्वर बसस्थानकाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल, असे मत प्रवासीवर्गाने व्यक्त केले आहे अन्यथा आठवणींच्या पाऊलखुणांत ''संगमेश्वर बसस्थानकाचा'' समावेश होणार यात आता कोणतीही शंका नाही. चारपदरी मार्ग सुरू झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकात येण्याऐवजी चौपदरीकरणात तयार केल्या जाणाऱ्या ''बसवे'' वर थांबून पुढे जाणार आहेत. परिणामी, संगमेश्वर बसस्थानकातील वर्दळ कमीच होणार आहे. विकासानंतर येऊ घातलेल्या समृद्धीत होणाऱ्या या बदलांचे स्वागत करायला संगमेश्वरवासीयांनी तयार राहायला हवंय!

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
----------------