दापोली अर्बनच्या अध्यक्षपदी जालगावकर

दापोली अर्बनच्या अध्यक्षपदी जालगावकर

दापोली अर्बनच्या अध्यक्षपदी जालगावकर
दाभोळ ः दापोली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा जयवंत जालगावकर यांची तर उपाध्यक्षपदी जालगावचे विनोद आवळे यांची निवड झाली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या दापोली अर्बन बँकेची निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बांगर यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे जयवंत जालगावकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विनोद आवळे यांची निवड करण्यात आली.
---------------
राष्ट्रसेविका समितीतर्फे व्याख्यानमाला
दाभोळ ः दापोली येथील राष्ट्रसेविका समितीच्यावतीने व्याख्यानमाला पुष्प ११ वे हा कार्यक्रम जालगाव येथील केळकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये व्याख्याते विनय जोशी यांनी देशातील पूर्वांचल या भागावर माहिती दिली. सुवर्णा जोशी यांनी गीत सादर केले. मनश्री भिडे यांनी प्रार्थना तर गौरी खोत यांनी वंदे मातरम् म्हटले तर अस्मी जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दापोली शाखेच्या तालुकाप्रमुख मंजुषा वैद्य, जिल्हा बौद्धिकप्रमुख डॉ. प्रविणा दांडेकर, प्रा. अशोक देशमुख, डॉ. शिवप्रसाद दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
------------------
दापोली रुग्णालय बांधकामासाठी निधी
दाभोळः दापोली उपजिल्हा रुग्णालयात नवीन इमारत बांधण्यात येणार असल्याने जुनी इमारत पाडण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाचे ५० बेड्सवरून १०० बेड्समध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी मंजूर झाला होता; मात्र त्यासाठी निधीची तरतूद करण्यात न आल्याने हे काम मागे पडले होते. आमदार योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघातून विजय मिळवल्यावर या प्रश्नांवर प्रथम लक्ष दिले व या कामासाठी निधीची तरतूद शासनाकडून करून घेतली. आता या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असून, त्यासाठी जुनी इमारत पडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी पाठवले जाणार नाही.

-----------------------
ओबीसी समाजातील समाजरत्नांचा सन्मान
दाभोळ ः राष्ट्रीय ओबीसी महासंघ रत्नागिरी यांच्यामार्फत दापोलीत ओबीसी जिल्हास्तरीय अधिवेशन व ओबीसी सन्मान सोहळा झाला. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या, प्रश्न, समाजावरील अन्याय, ओबीसी जातनिहाय जनगणना, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ध्येयधोरणे व ओबीसी समाजातील समाजरत्न यांचा ओबीसी सन्मान करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केले. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरत, अखिल भारतीय कामगार संघटना उपाध्यक्ष विजय मांडवकर, पंतप्रधान जनकल्याण प्रदेश संघटन महामंत्री वसंत सुतार आदी उपस्थित होते. यावेळी १५१ ओबीसी बांधवांचा सन्मान करण्यात आला. डॉ. तायवाडे यांनी विधानसभा, लोकसभेतही ओबीसी समाजाला आरक्षण द्या. लोकसभा निवडणुकीतही ओबीसी समाजाला आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे, असे सांगत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांतही २७ टक्के आरक्षण होते ते पूर्वीप्रमाणे ओबीसी समाजाला लागू करण्यात यावे, ओबीसी मंत्रालयही सुरू करावे, अशा मागण्या आपण शासनाकडे करणार असल्याचे यावेळी सांगितले.

------------------------

चिपळुणात धोकादायक झाडांची छटाई

चिपळूण ः चिपळूण पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांवर जोर दिला आहे. पावसाळ्यात वादळ-वाऱ्यासह होणाऱ्या अतिवृष्टीत झाडे कोसळणे व फांद्या तुटून पडतात. यामध्ये अपघातही होतात. भविष्यातील हे प्रकरा टाळण्यासाठी शहरातील धोकादायक झाडे व फांद्या छाटणीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक ठरणारी झाडे व फांद्या तोडल्या जातात. त्यानुसार चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात हे काम सुरू झाले आहे. रस्त्यालगत नगर पालिका मालकी जागेतील असलेली धोकादायक झाडे पालिका प्रशासनाकडून तोडली जात आहेत. या कामाचा ठेका देण्यात आला असून, अनुभवी कामगारांकडून ते काम करून घेतले जात आहे. जी झाडे खासगी जागेत आहेत त्यांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावून आपल्या परिसरातील धोकादायक झाडे तोडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यालाही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती साडविलकर यांनी दिली आहे.

----------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com