जिल्ह्यात भरड धान्य अभियान

जिल्ह्यात भरड धान्य अभियान

05338
ओरोस ः ऑनलाईन बैठकीत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण.

जिल्ह्यात भरड धान्य अभियान

पालकमंत्र्यांची माहिती; ओरोसला उद्या पौष्टिक तृणधान्याबाबत जागृती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधू आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सोमवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्त्व जनजागृती कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्‍घाटन होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाण्यांचे वाटप होणार आहे.
यासंदर्भात आज पालकमंत्री चव्हाण यांनी ऑनलाईन बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, ‘स्नेहसिंधू’चे अध्यक्ष हेमंत सावंत, सदस्य पंकज दळी, संदीप राणे, डी. आर. परब आदींसह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राऊत यांनी सर्वांचे स्वागत करून नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा बँक उपाध्यक्ष काळसेकर यांनीही यावेळी पाच टन भरड धान्यांचे बियाणे गोळा केल्याचे सांगितले. यात नाचणी, कांग, सावा, कोडो, छोटे वरी, ब्राऊन टॉप यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश परुळेकर यांचे ‘भरड धान्याचे महत्त्व’ यावर व्याख्यान होणार आहे. त्याचबरोबर भरड धान्याच्या महत्त्वाविषयी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राऊत यांनी केले आहे.
................
‘भरड धान्यांचा वापर आहारात महत्त्वाचा’
काही वर्षांपूर्वी आपल्या सर्वांच्या आहारात भरड धान्यांचा समावेश होता. बदलत्या काळात तो कमी होत गेला. काही ठिकाणी भरड धान्यांचा वापर आहारातून बाजूला गेला आहे. या पौष्टिक भरड धान्यांचा आहारात वापर होण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले जात आहे. त्याची जनजागृती होण्याच्या दृष्टीने आणि आहारातील महत्त्व समजण्यासाठी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम होत आहे. याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात येत आहे. अशा पौष्टिक भरड धान्यांचा आहारात वापर करावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com