
साखरपा ः महामार्ग चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक
rat27p5.jpg
05331
साखरपाः बांधकाम तोडताना जेसीबी.
साखरपा परिसरात
घरांची तोडफोड
ना नोटीस ना माहिती; ग्रामस्थ संतप्त
साखरपा, ता. २७ः महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात ठेकेदार कंपनीने साखरपा परिसरात अचानक घरांची तोडफोड सुरू केली आहे. मालकांना कोणतीही लेखी सूचना न देता पावसाळ्याच्या ऐन तोंडावर ही तोडफोड सुरू केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्याचे काम झाले. यानंतर टप्प्याटप्प्यात रूंदीकरण व रस्ताकटाई कामाला प्रारंभ झाला. यानंतर सध्या साखरपा गावात हायवेबाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत आहे म्हणून लवकरात लवकर घरे खाली करावीत, असे सांगण्यात आले आहे; मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झाली नाही आहे. त्यामुळे अचानक पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा प्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत.