
रत्नागिरी ः किनारपट्टीवरील साहसी क्रीडाप्रकारांना ब्रेक
किनारपट्टीवरील साहसी
क्रीडाप्रकारांना ब्रेक
पर्यटन विभागाच्या सूचना; पर्यटकांचा हिरमोड
रत्नागिरी, ता. २७ः पावसाळा जवळ येऊ लागल्याने वातावरणात बदल होत आहे. खराब हवामानामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जल व साहसी क्रीडा पर्यटन २६ मे पासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. पर्यटन हंगाम संपता संपता हे आदेश आल्यामुळे अखेरच्या टप्प्यात जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. कोकण किनारपट्टीवरील साहसी क्रीडाप्रकारांना त्यामुळे ब्रेक लागला.
मागील काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील अनेक किनारपट्ट्यांवर साहसी क्रीडाप्रकार, नौकानयन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे-काजीरभाटी, आरेवारे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावर्षी उशिराने सुरू झालेल्या पर्यटन हंगामात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली होती. विशेषत: जलपर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत होता. सध्या वॉटरस्पोर्टस् चालवणार्या संस्थांना ३१ मे पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मान्सून जूनमध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच हवामानात बदल होऊ लागला आहे. यामुळे उत्साही पर्यटकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये या दृष्टीने पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांनी सर्व वॉटरस्पोर्टस् संस्था चालकांना २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलपर्यंटन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आदेश मिळाल्याने शनिवार (ता. २७) मेपासून जलपर्यटन बंद ठेवले आहे. चौथा शनिवार व रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आले होते. ऐन हंगामात हा आदेश आल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.