बाजूपट्टी डांबरीकरणाचे कंपनीला आदेश

बाजूपट्टी डांबरीकरणाचे कंपनीला आदेश

05397
सावंतवाडी ः येथे कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी चर्चा करताना संजू परब, प्रियांका नाईक, जावेद खतीब, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे आदी.


बाजूपट्टी डांबरीकरणाचे कंपनीला आदेश

‘बांधकाम’ला जाग; बांदा-दोडामार्ग रस्ताप्रश्नी मागणीची दखल

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी संबंधित कंपनीने बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे खोदाई केल्याने या कंपनीला तात्काळ बाजूपट्टीचे डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी अभियंता चव्हाण यांची सावंतवाडी येथे भेट यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली.
बाजूपट्टी खोदण्यात आल्याने बांदा दोडामार्ग रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या रस्त्याच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी बाजूपट्टीत ट्रक रुतण्याची देखील घटना घडली होती. त्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी स्थानिकांसह या रस्त्याची पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांची भेट घेण्यात आली. यावेळी सावंतवाडीचे माजी नागराध्यक्ष संजू परब, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, रत्नाकर आगलावे आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जोपर्यंत बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा पवित्रा उपसरपंच खतीब यांनी घेतला. यावेळी अभियंता चव्हाण यांनी संबंधित कंपनीला भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्याची परवानगी आपल्या खात्याने दिल्याचे मान्य केले. स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून समज देण्यात आली असून तत्काळ बाजूपट्टीचे काम पूर्ववत करून देण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बांदा ग्रामपंचायत शिष्टमंडळाला श्रीमती चव्हाण यांनी लेखी पत्र देऊन माहिती दिली.
..............
कोट
पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच बांधकाम विभागाने याची दखल घेत तात्काळ काम करण्याचे लेखी आश्वासन दिले.
- बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com