
गव्याने धडक दिल्याने खांबाळेत रिक्षा उलटली
05431
वैभववाडी ः गव्याच्या धडकेत रिक्षाचे झालेले नुकसान.
गव्याने धडक दिल्याने
खांबाळेत रिक्षा उलटली
प्रवासी बचावले; वाहनाचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः चालत्या रिक्षाला गव्याने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. हा प्रकार वैभववाडी-फोंडा मार्गावर खांबाळे दंड येथे काल (ता. २६) रात्री आठच्या सुमारास घडला. या अपघातात रिक्षातील प्रवासी सुदैवाने बचावले; मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
खांबाळे येथील रिक्षा चालक अनंत हिंदळेकर हे काल रात्री तीन आसनी रिक्षामधून आचिर्णे येथून प्रवासी घेऊन वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जात होते. यादरम्यान खांबाळे दंड येथे रिक्षा आली असता त्यांच्या समोर अचानक गवा आला. गव्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाली. रिक्षात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशी होते; मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. धडकेनंतर गवा पळून गेला. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. याबाबत चालक हिंदळेकर यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली. सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये गव्यांचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खांबाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावार वाढला आहे. वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.