
मंडणगड - मायभूमीची ग्रामीण भागात आरोग्यसेवा
Rat२६p३.jpg
०५०८५
आसावलेः आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेताना नागरिक.
मायभूमीची ग्रामीण भागात आरोग्यसेवा
आसावले येथे शिबिर ; १८९ नागरिकांनी घेतला लाभ
मंडणगड, ता. २६ ः मायभूमी फाउंडेशनच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांना निःशुल्क आरोग्यसेवा देण्यात येत असून त्याचा थेट फायदा रुग्णांना होत आहे. आसावले येथे शुक्रवारी (ता.१९) घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १८९ नागरिकांनी आपली तपासणी करून घेत या उपक्रमाचा लाभ घेतला. मायभूमी फाउंडेशनच्या या सामाजिक सेवेचे कौतुक करण्यात येत आहे.
तालुक्यातील आसावले या गावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे व कुंबळे यांच्या सहकार्याने आयोजित या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, कंबरदुखी, हातपाय दुखी, दम्याचे आजार, रक्ततपासणी अशा विविध आजारांचे उपचार देण्यात आले तसेच आभा कार्ड व मोफत औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी श्रद्धा हॉस्पिटलचे नारायण कुलकर्णी तसेच डॉ. नवाळे आणि वैद्यकीय पथकाचे विशेष सहकार्य लाभले. मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत काप यांनी सर्वांचे आभार मानून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण व मुंबई ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यासाठी मायभूमी फाउंडेशन व त्यांची संपूर्ण टीम प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे सांगितले. शिबिरामध्ये एकूण १८९ नागरिकांनी सहभाग घेत आपल्या विविध तपासण्या करून घेतल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी आसावले ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण मंडळ यांनी सहकार्य केले.
-----
चौकट
मुंबईत येणाऱ्या रुग्णांना २४ तास सेवा;
मायभूमीच्या माध्यमातून गावावरून पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या रुग्णांना फाउंडेशनची टीम २४ तास सेवा देत आहे. योग्य उपचार मिळावेत यासाठी कठोर परिश्रम घेत रुग्णांना अॅडमिट करण्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत सहकार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या या भावनेचे सर्वच स्तरातून कौतुक आणि आभार मानण्यात येत आहे.