
यशप्राप्तीच्या प्रवासाचा आनंद लुटा
05497
कुडाळ ः एमकेसीएल ऑलिम्पियाड मुव्हमेंट (मॉम) स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण प्रसंगी तहसीलदार अमोल पाठक, अॅड. राजीव बिले, प्रणय तेली, सई तेली, रश्मी बाईत आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
यशप्राप्तीच्या प्रवासाचा आनंद लुटा
अमोल फाटक; कुडाळात ‘ऑलिम्पियाड मुव्हमेंट’चे बक्षीस वितरण
कुडाळ, ता. २८ ः यश हे कधी अंतिम नसते, तर तो एक प्रवास असतो, जो विद्यार्थ्यांनी आनंदाने आत्मसात करत राहायला हवे. विद्यार्थ्यांनी यशाचा केवळ आनंद न घेता त्या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे. यशाची व्याख्या करता येत नाही. यश हे प्रत्येकाच्या मते वेगवेगळे असते. जीवनात यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अमोल फाटक यांनी पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल ऑलिम्पियाड मुव्हमेंट (मॉम) स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण प्रसंगी केले.
विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत सामान्य ज्ञान, नैतिक मूल्य, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल अर्थात मृदू कौशल्य गरजेचे असतात. यासाठी ‘एमकेसीएल’मार्फत दरवर्षी पाचवी ते नववीतील एसएससी बोर्डाच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयाची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘ऑलिम्पियाड मुव्हमेंट’ स्पर्धा परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा सर्व एमएस-सीआयटी केंद्रावर घेतली गेली होती. या परीक्षेकरिता राज्यात १८,५०० विद्यार्थी बसले होते. यात सिंधुदुर्गातील ७५० जणांचा समावेश होता. यातील विजेता विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, लोकल लीड सेंटर सिंधुदुर्गमार्फत काल (ता. २७) करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता अॅड. राजीव बिले, एमकेसीएल सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली, नोबल कॉम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सई तेली, मधुरा कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका रश्मी बाईत आदी उपस्थित होते.
संगणक ही काळाची गरज झाली आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. जुन्या गोष्टी आता नव्या बदल्याने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन अॅड. बिले यांनी केले.
विजेत्या विद्यार्थ्यांचा तहसीलदार पाठक, अॅड. बिले यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यामध्ये सातवीतून राज्यपातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त योगेश जोशी, आठवीतून प्रथम क्रमांक श्रेयस बर्वे यांना धनादेश देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पातळीवर पाचवीतून यश मिळविलेले पूर्वी फाटक, निधी राऊत, योगेश परुळेकर, सहावीतील देवांशू वेंगुर्लेकर, दुर्वा ठाणेकर, चैताली सावंत, सातवीतील साक्षी रावराणे, राजीव डामरी, खुशी तोंडवळकर, आठवीतील शिवम राणे, ओजस मिस्त्री, मयुरेश सावंत, नववीतील देवदत्त गावडे, इशा चव्हाण, आत्माराम म्हाडगुत यांना रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सई तेली यांनी आभार मानले.
--
नव तंत्रज्ञानाबाबत धडे
प्रणय तेली यांनी २१ व्या शतकातील नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा नवनवीन टेक्नॉलॉजींबाबत माहिती देऊन आपले पुढील भविष्य या गोष्टींवर अवलंबून असल्याचे सांगितले. कॉम्प्युटरवर परीक्षा देता आल्याने चांगल्या पद्धतीने तयारी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले.