
वीज कंत्राटी कामगारांना न्याय द्या
05501
आनंद लाड
वीज कंत्राटी कामगारांना न्याय द्या
कामगार संघ; ‘आयटीआय’च्या अटीबाबत उपमुख्यमंत्र्यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः महावितरण कंपनीत अनेक वर्षे काम करून अनुभव व कौशल्य प्राप्त केलेल्या नाशिक व जळगाव परिमंडळातील कुशल वीज कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज कंपनीत भरतीवर बंदी असताना त्याकाळात नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कंत्राटी कामगारांना नेमण्याचा प्रघात सुरू झाला. त्यावेळी आयटीआय शिकलेले कामगार कमी वेतनात धोकादायक वीज उद्योगात काम करण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्या पदांवर तत्कालीन प्रशासन व कंत्राटदारांनी कामासाठी मिळेल ती माणसे भरून जनतेला वीज सेवा पुरवली. हेच अशिक्षित कामगार आता १०-१५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाने कुशल झाले आहेत. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी जीवाची बाजी लावून या कामगारांनी हा धोकादायक रोजगार पत्करला व वीज कंपनीच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावला. आजवर अनेक कामगारांनी आपले बलिदान सुद्धा दिले. कोरोना काळात देखील जीवाची पर्वा केली नाही, याची जाण कंपनी प्रशासनाला असणे गरजेचे आहे. नियमावली कामगार हितार्थ असावी, यासाठी संघटना आग्रही आहे व राहील. ''गरज सरो वैद्य मरो'' असे अचानक म्हणत अचानक नियमावली दाखवत नाशिक व जळगाव परिमंडळातील अनेक अनुभवी व कुशल कामगारांना आयटीआय शिक्षणाची अट घालून कामावरून कमी केले जात आहे. कामगार दिनापासून इतर कामगार कमी करण्याच्या सूचना नाशिक व जळगाव परिमंडळात आहे. त्यांच्या जागी नवीन कामगार नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून हे दुर्दैवी आहे. या वीज कंपन्यांच्या उत्कर्षामध्ये मागील १५-२० वर्षे योगदान असलेल्या या कंत्राटी कामगारांना आता न्याय व रोजगार अपेक्षित आहे. सध्या नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला येथील कामगारांचा रोजगार जाऊ नये व अन्य प्रलंबित विषयांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्ट मंडळासोबत बैठक आयोजित करून याबाबत चर्चा करावी. तोपर्यंत कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू न करण्याच्या सूचना महावितरणला द्यावी, अशी मागणी केली आहे.