
14 हजार प्रवाशी विस्टाडोम कोचमधून फिरले
विस्टाडोम कोचचा लाभ
चौदा हजारावर प्रवाशांना
सहा महिन्यातील स्थिती; जनशताब्दी, तेजसला कोच
रत्नागिरी, ता. २८ः कोकणवासीयांना मध्य रेल्वेच्या विस्टाडोम कोचची चांगलीच भुरळ पडली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल १४ हजारांहून अधिक प्रवाशांनी कोकणचे हिरवेगार सौंदर्य, डोंगर-दऱया पाहण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसला जोडलेल्या विस्टाडोम कोचने प्रवास केला आहे.
रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना निसर्ग सौंदर्य, बोगदे, डोंगरदऱ्या, खळखळणारे झरे, धबधबे पाहता यावेत म्हणून मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेसला प्रत्येकी एक विस्टाडोम कोच जोडला जातो. तसेच पुण्याला जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेसलाही हा डबा जोडला जात असून त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचची गेल्या सहा महिन्यातील प्रवासी क्षमता ७ हजार ९६४ एवढी होती, त्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल ८ हजार २५६ प्रवाशांना या कोचने प्रवास केला आहे. तर तेजस एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचची सहा महिन्यांची प्रवासी क्षमता ६ हजार २९२ असताना ६ हजार ५५ जणांनी प्रवास केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील एएक्स्प्रेस गाड्यांना जोडल्या जाणाऱ्या विस्टाडोमने जवळपास ५२ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकूण विस्टाडोम कोचचे भारमान ९५ टक्क्यांपर्यंत आहे.