
रुग्णवाहिका बंद पडल्याने अत्यवस्थ रुग्णाची हेळसांड
05631
मालवण ः रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेणारी १०८ रुग्णवाहिका वाटेत बंद पडली.
रुग्णवाहिका बंद पडल्याने
अत्यवस्थ रुग्णाचे हाल
मालवणातील प्रकाराने यंत्रणेची धावपळ
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : एका वृद्धाला छातीत वेदना होत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले; मात्र त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय रुग्णालयातर्फे घेण्यात आला. रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेत असताना शहर पोस्ट ऑफिससमोर रुग्णवाहिका अचानक बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. अखेर खासगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला रुग्णालयात दाखल केले. या प्रकाराचा नाहक त्रास रुग्णाला सहन करावा लागला.
याबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्याशी संपर्क केला असता ग्रामीण रुग्णालय येथील १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने ती दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली असून त्या जागी पर्यायी स्वरूपात दुसरी १०८ रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयास देण्यात आली होती, असे स्पष्ट केले; मात्र पर्यायी रुग्णवाहिकेचे टायर झिजलेले असल्याने रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेताना ती नादुरुस्त होऊन वाटेतच बंद पडली. रुग्णवाहिकेतील कर्मचारी व स्थानिकांनी प्रसंगावधान राखत लागलीच खासगी रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेले. अपघात व अन्य गंभीर स्वरूपातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असताना नादुरुस्त रुग्णवाहिका उपलब्ध असतील तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.