
ठाकरे शिवसेनेतर्फे 12 वी गुणवंतांचा सन्मान
ठाकरे शिवसेनेतर्फे १२ वी गुणवंतांचा सन्मान
साडवली, ता. २९ः संगमेश्वर तालुका उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, युवासेना, देवरूख शहर शिवसेनेच्यावतीने बारावी परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. नक्षत्र हॉल खालची आळी येथे हा सोहळा झाला. या वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख म्हणून उद्योजक सुरेश कदम यांची निवड झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी सभापती अजित गवाणकर यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला. या वेळी संतोष लाड, अनिल भुवड, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, वैभव पवार, प्रकाश मोरे, बंड्या बोरूकर, जनक जागुष्टे आदी उपस्थित होते.
मुलांना मार्गदर्शन करताना कदम यांनी नवीन तंत्रज्ञान तुमच्या हाताशी आहे. त्याचा उपयोग करून प्रगती करावी. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्यातच करियर करावे. मित्र-मैत्रिणींनी क्षेत्र निवडले म्हणून मी पण निवडले असे करू नये. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करा. नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनून अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करा, असा मोलाचा सल्ला कदम यांनी दिला.
संतोष लाड यांनी शिवसेनेतर्फे कायमच मुलांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आज हेच विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. मुलांनी पालकांनी आपल्याला घडवले याची जाणीव ठेवून आपले लक्ष्य साध्य करावे, असे आवाहन केले. अजित गवाणकर यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी व पालक यांनी कौतुक केले.