
17.5 टन काजू तारणातून 13 लाख कर्ज वितरीत
काजू तारणातून १३ लाख कर्ज वितरित
हंगामात ५० टनाच्या उद्दिष्ट पैकी १७.५ टन तारण; नुकसान टाळण्यासाठी योजना
रत्नागिरी, ता. २९ : जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, भाताला हमीभाव दिला जातो. काजू पीक शेतकऱ्यांना अर्थार्जन मिळवून देणारे असले, तरी सुरुवातीचा भाव शेवटी गडगडतो. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आतापर्यंत १७.५ टन काजू तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
काजू भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी अल्प दरात काजू विकून नुकसान करून घेऊ नये, यासाठी बाजार समितीकडून शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी ५० टन काजू तारण ठेवून कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. सहा महिने (१८० दिवस) करिता वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. सुरुवातीला १२० रुपये काजूला दर मिळाला होता. त्यानंतर मात्र भाव गडगडला. सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्य आहे.
--------
चौकट
चार वर्षांत शेतमाल तारण योजनेतील सहभाग
वर्ष शेतकरी वजन (टनामध्ये) कर्ज (रुपये)
* २०१८-१९ १६ ९०.४ ७६१०७५०
* २०१९-२० १४ ९०.२४ ५०५३४४०
* २०२०-२१ २३ १८८.०६ १५१६९५३०
* २०२१-२२ ११ ७७.५ ७२०७५००
--------