पाऊस मोजून घेऊया

पाऊस मोजून घेऊया

टेक्नोवर्ल्ड ..............लोगो

rat२९p६.jp
०५६७५
प्रा. संतोष गोणबरे
-----------

पाऊस मोजून घेऊया

पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे. जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावामुळे उद्भवते. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे म्हणजेच वाफेचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५,०५,००० घन किमी पाऊस पडतो. त्यातील सरासरी ३,९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. वर्षभरात किती पाऊस पडला यावरून पुढील वर्षी किती पाऊस पडेल आणि यावर्षीच्या मानाने गेल्या वर्षी किती पाऊस पडला होता, याचा अभ्यास करण्यासाठी पाऊस मोजला जातो तसेच पावसाच्या प्रमाणामुळे भूगर्भात पाण्याची पातळी किती असेल आणि पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल की नाही, याचाही अंदाज लावण्यासाठी पाऊस मोजावा लागतो. अर्थात् पाऊस मोजणे तसे चिकाटीचे आणि संमिश्र व्यवस्थापनाचे काम असल्याने पूर्णपणे अचूक माहिती प्राप्त होत नाही आणि हवामानखात्याचे अंदाज काहीवेळा चुकतात; पण आपल्याला आपल्या परिसरातील पावसाची माहिती असणे गरजेचे असल्याने आपण आपल्या पद्धतीने ती संग्रहित करूया.
---------

पर्जन्यमापनाचा इतिहास कौटिल्यापासून सुरू होतो. त्यांच्या अर्थशास्त्रात तसा उल्लेख आहे. आधुनिक साधने विकसित होण्यापूर्वी दगडापासून पर्जन्यमापक यंत्र तयार केले जाई. ३ फूट व्यासाचा आणि १० फूट उंचीचा दगड तयार केला जात असे. वरच्या बाजूला उखळासारखा आकार दिला जात असे. कमीत कमी बाष्पीभवन व्हावे व पर्जन्य वापरण्यात अचुकता यावी यासाठी वरचा भाग निमुळता ठेवला जाई. उखळासारख्या या आकाराच्या तळाशी एक छिद्र असे. हे छिद्र चिखल व लाकडी पट्टी लावून बंद करता येत असे. असे तयार झालेले यंत्र जंगलात शेतात सहसा दृष्टिपथात येणार नाही अशा ठिकाणी खोल खड्डा खणून रोवले जाई. आधुनिक काळात पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. लिटर, प्रतिचौरस मीटर किंवा मिलिमीटर यावरून पाऊस मोजला जातो. यात ''मिलिमीटर'' व ''इंच'' परिमाण वापरले जाते. आपल्या देशातील बहुतेक भागांत जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. ठराविक वेळत झालेली पर्जन्यवृष्टी मोजण्यासाठी पर्जन्यमापक (रेनगेज) एक हवामानशास्त्रीय साधन आहे. याचे दोन प्रकार आहेत रेकॉर्डिंग पर्जन्यमापक व नॉनरेकॉर्डिंग पर्जन्यमापक. रेकॉर्डिंग पर्जन्यमापक हे यंत्र स्वयंचलित असून, यामध्ये घड्याळावर चालणारा ड्रम, त्यावर बसवलेले आलेखपत्र (ग्राफ) आणि त्यावर आलेखन करणारी पेन्सिल इत्यादींचा समावेश असतो. पडलेला पाऊस आलेखपत्रावर आपोआप वाचता येतो. या पर्जन्यमापकावर ठराविक कालावधीत पडलेला पाऊस तसेच पावसाची तीव्रतासुद्धा (मिलिमीटर /तास) मोजता येते. याचे टिपिंग बकेट रेनगेज, ध्वनीद्वारे पर्जन्यमापन व ऑप्टिकल रेनगेज असे प्रकार आहेत.
नॉनरेकोर्डिंग पर्जन्यमापक हे अगदी साधेसोपे यंत्र असून, या द्वारे निश्चित असं प्रमाण सांगता येत नसलं तरी पाऊस किती पडला असेल याचा एक अंदाज बांधता येतो. ही पद्धत आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वापरात आहे. या उपकरणाला ''सायमन्स रेनगेज'' म्हटलं जातं. हे उपकरण जमिनीवर पक्के बसवलेले असते. दररोज सकाळी ८ वा. पर्जन्यमापकाच्या बाटलीत जमा झालेला पाऊस प्रमाणित मोजपात्राद्वारे मिलिमीटर वा इंचामध्ये मोजला जातो. पाऊस जमा करणारी बाटली साधारणत: १०० मिमी व्यासाची असते आणि ती १०० ते १२५ मिमी पाऊस जमा करते. मोठ्या पावसाच्या कालावधीत दिवसातून तीन-चारवेळा मोजणी करावी लागते.
पर्जन्यमापक यंत्राला रेनमीटर, हायड्रोमीटर, युडोमीटर, प्लविओमीटर किंवा ओमब्रोमीटर असेही म्हटले जाते. पाऊस जरी मिलीमीटर किंवा इंचामध्ये मोजला जात असला तरी जेव्हा तो जमिनीवर गोळा होतो किंवा प्रवाहित होतो तेव्हा तो वेगवेगळ्या परिमाणांत मोजला जातो. स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर, घनफूट किंवा घनमीटर ही एकके वापरतात तर वाहते पाणी मोजण्यासाठी टीएमसी, क्युसेक किंवा क्युमेक ही एकके वापरतात. १ टीएमसी म्हणजे १,००,००,००,००० घनफूट म्हणजेच २८,३१६,८४६,५९२ लिटर म्हणजेच २८३१ कोटी लिटर होय. धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टीएमसी या एककामध्ये मोजतात. एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते तर एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. याचा अर्थ एक सेकंदात १ हजार लिटर पाणी बाहेर पडते. महाराष्ट्रातील उजनी धरणाची पाणीक्षमता ११७.२७ टीएमसी आहे तर कोयनेची क्षमता १०५.२७ टीएमसीएवढी आहे. १ इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर आणि एक सेंटिमीटर म्हणजे १० मिलिमीटर; या तत्त्वाने आपल्या परिसरात या वर्षी सरासरी किती पाऊस पडला, त्यातून आपल्या परिसरातील धरणात किती पाणीसाठा निर्माण होईल आणि तो पुढील वर्षभरात किती पुरेल याचे साधे आणि सोपे गणित आपण मांडू शकतो.
भारतातील सर्वाधिक सरासरी पाऊस मौसिनराम (मेघालय) येथे ११ हजार ८७३ मिलीमीटर पडल्याची नोंद आहे. चेरापुंजी (मेघालय) येथे दरवर्षी सरासरी ११ हजार ७७७ मिमी पाऊस पडतो. आपल्या महाराष्ट्रात आंबोली घाटात सरासरी ७ हजार १८४ मिलीमीटर पावसाची नोंद होते. ''पाऊस अलार्म'' हे ॲप मोबाईलवर उपलब्ध आहे जे आपल्याला पाऊस पडणार असल्यास सावध करते. हवामानखात्याने गोळा केलेल्या डाटावरून ही भविष्यवाणी केली जाते. पाऊस, विजांचा कडकडाट, गारा, वादळ इत्यादी सर्व माहिती या अॅपद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते. पूर्वीच्या काळी हवामानखात्याचे बरेचसे अंदाज चुकीचे ठरत असत; मात्र आता उपग्रहांच्या माध्यमातून माहिती गोळा करून तिचे व्यवच्छेदक विश्लेषण करण्याची पद्धती बदलल्याने या पूर्वसूचना बऱ्याच अंशी बरोबर येतात. आपण शेतकरी असू, उद्योजक असू किंवा व्यापारी असू तर आपल्याला आपल्या प्रदेशातील पावसाची स्थिती माहित असणे गरजेचे असते. आपण जर विद्यार्थी असू तर या माहितीवरून सखोल अभ्यास करून काही सैद्धांतिक मांडणी करता येईल जिचा उपयोग अनेकांना होऊ शकेल. हवामान लहरी असल्याने पाऊसही लहरी झाला आहे. फुलपाखराचे बागडणे जसे मर्यादित व्याख्येत येत नाही तरीही त्यासाठी ''कॅओस थिअरी'' विकसित करण्यात आली आहे तसेच पावसाचे येणे-जाणे शंभर टक्के आकडेवारीने विषद करता येणे शक्य नसले तरी सातत्याच्या अभ्यासाने ते घोषित करता येऊ शकते. आपणही आपल्या परिसरातील पावसाच्या नोंदी ठेवल्यास पुढील काळात त्या नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com