बुद्धी, वाणी, लेखणी आहे तोपर्यंत ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही

बुद्धी, वाणी, लेखणी आहे तोपर्यंत ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही

बुद्धी, वाणी, लेखणी असेपर्यंत ध्येयापासून दूर नेणे अशक्य
अॅड. परूळेकर; सावरकरांनी शिरगावात केला समाजसुधारणेचा प्रायोगिक प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ः अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर वीर सावरकरांनी सरकारवर टीका करायची नाही, राजकारणात भाग घ्यायचा नाही, अशा अटी घालून सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले; पण त्या वेळी सावरकरांनी उत्तर दिले. कितीही संकटे येऊ देत जोपर्यंत बुद्धी, वाणी व लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत तोपर्यंत कोणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही. त्यामुळेच रत्नागिरी ही ऐतिहासिक जागा ठरली. त्यांनी प्रथम शिरगावमध्ये कार्यक्रम केला. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू गीत लिहिले. मुलांनी हे गाणे हनुमान मंदिरात म्हटले. संपूर्ण समाजसुधारणेचा प्रायोगिक प्रकल्प केला व नंतर ते रत्नागिरीत आले, असे प्रतिपादन पतितपावन मंदिराचे माजी अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर यांनी केले.
सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, रत्नागिरी खूप छोटी होती; पण कर्मठ होती. संपूर्ण कर्मठ रत्नागिरीला सुधारण्याचे काम एका बॅरिस्टरने केले. ज्याला सनद दिली नाही, जिथून आपण मिरवणूक काढली तिथे सावरकरांनी गाडा घेऊन, ओरडून स्वदेशी वस्तूंची विक्री केली, असा हा पुण्यप्रद रस्ता आहे. या लहानशा रत्नागिरीत सावरकर १६ वर्षे वास्तव्यास होते. त्यांची प्रत्येक कानाकोपऱ्यात सावरकरांची स्मृती आहे. लक्ष्मीचौक, व्यायामशाळा असो वा सोनं लुटण्याचा कार्यक्रम असेल किंवा मेळे असतील, सावरकरांनी राष्ट्रभक्ती जागृत केली.
ते म्हणाले, मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने लक्ष्मीचौकात सावरकरांचे म्युरल लावले आहे. ज्या ठिकाणी सावरकरांचे जीवन एका दृष्टिक्षेपात पाहायला मिळतील असे वेगवेगळे प्रसंग चित्रित आहेत. सामाजिक समरसतेचे पतितपावन मंदिर असून, राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. कर्मठ लोकांच्या वागणुकीमुळे इथला समाज स्वतःला अस्पृश्य मानतो. जे लोक अस्पृश्य मानतात त्या सर्वांचा देवाकडे कल लक्षात घेता देवाचा पदस्पर्श घेऊन स्वतःला भक्त मानणारा नागरिक तो पूर्वास्पृश्य पूर्णपणे पवित्र होऊ शकतो, हे सावरकरांना माहिती होते म्हणूनच हे लक्ष्मी-विष्णूचे मंदिर पतितपावन मंदिर झाले. ज्याला आपण पतित आहोत असे वाटते त्याला पावन करणारे मंदिर, समाधान देणारे मंदिर आहे.
बाबा परूळेकर यांनी सांगितले, मंदिराच्या समोरच्या बाजूला सप्तबंदीविरुद्ध सावरकरांनी लढा दिला. त्याचे म्युरल केले आहे. मंदिर पूर्ण व्हायच्या आधी हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढींविरुद्ध म्हणजे रोटी, बेटी, स्पर्श, व्यवसाय बंदी या सर्वांविरोधात यल्गार केला. यल्गाराचे पहिले व्याख्यान येथे दिले. रत्नागिरीकरांच्या साक्षीने सप्तबंदीचा बिमोड केला म्हणून येथे हे म्युरल उभारले आहे. हा इतिहास आहे. हा बराचसा इतिहास लिहिला गेला नाहीये. त्याकरिता आयसीएचआरची परिषद झाली. जे इथे घडलंय ते लिहून ठेवलं पाहिजे. ते काम सुरू झाले आहे.

चौकट
तेजाचा गाभारा
१९८३ ला पु. ल. देशपांडे यांनी सावरकरांच्या जन्मशताब्दीवेळी अंदमानातील कोठडीचे दर्शन घेतले. त्यांनी भाषणात सांगितले, ही एकांत कोठडी नव्हे तर येथे प्रत्यक्ष तेज वस्तीला होतं. तो गाभारा होता. ती कधीच कोठडी राहात नाही. रत्नागिरीच्या तुरूंगातील कोठडी त्याला गाभारा आहे. छानसे प्रदर्शनही आहे. पर्यटकांचे स्थान नव्हे तर पुण्यभूमीचे क्षेत्र आहे, असेही परूळेकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com