एसआरटी पद्धतीने एका वर्षात तीन पिके

एसआरटी पद्धतीने एका वर्षात तीन पिके

कृषी तंत्र...
........................

इंट्रो

धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्यांना आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीकरचना. दरम्यान, जमिनीची धूप न होता कमी खर्चात नांगरणी, चिखलणी आणि कोळपाणी न करता भरघोस उत्पन्न देणारी शेतीपद्धती शेतकऱ्यांना आवडली. एका वर्षात किमान तीन पिके एसआरटी पद्धतीने घेता येत असल्याने अनेक राज्यातील शेतकरी आकर्षित झाले आहेत. चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांच्या टीमने २०११ मध्ये सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे एसआरटी तंत्र शोधून काढले आणि त्याचा वापर होऊ लागला आहे.
- उपसंचालक (माहिती), कोकण विभाग, नवी मुंबई
-----
एसआरटी पद्धतीने एका वर्षात तीन पिके

कमी खर्चाच्या व कमी कष्टाच्या या तंत्रात शेतकऱ्यांचे जमिनीच्या मशागतीचे दिवस व हंगाम साधायचे अती मूल्यवान १०-१५ दिवस हातात मिळतात. पहिल्या पिकाची मुळे वाफ्यात शिल्लक ठेवल्याने पुढच्या पिकाच्या सेंद्रिय कर्बाची गरज भागते. मुळांच्या जाळीमुळे पाण्याचा ताण पडला तरी जमीन भेगाळत नाही. सशक्त जमिनीतील रोपांना रोग व किडी फार कमी प्रमाणात त्रास देतात. पिकांच्या रासायनिक खताच्या गरजेचे प्रमाण व विषारी कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रमाण दरवर्षी कमी कमी होत जाते. शिवाय उत्पन्नांत तिपटीने वाढ होते हे महत्वाचे. एसआरटी पीकपद्धतीत एकदा तयार केलेले गादीवाफे पुढील किमान २० वर्षे मोडण्याची गरज नसते. सगुणा बागेत बिजांच्या टोकणणीसाठी एक साचा विकसित करण्यात आला आहे. शेतकरी आपापल्या गावात असे हे साचे तयार करून घेऊ शकतात. पिकांचे योग्य नियोजन केल्यास वर्षातून किमान तीन पिके घेता येणे या पद्धतीत सहजशक्य होते. आज महाराष्ट्रातील विविध भागात एसआरटीच्या त्याच गादीवाफ्यावर अनेक पिके घेतली जात आहेत. जसे की खरिपात भात, नाचणी, वरी, भूईमूग, कापूस, सोयाबीन, कांदा, मका, कारळ/खुरासणी व रब्बीमध्ये गहू, कलिंगड, टोमॅटो, मिरची, वांगी, कारली, शिरली, दुधी, मटार/वाटाणा, पालेभाज्या इत्यादी पिके घेता येतात.
सर्व प्रकारच्या भौगोलिक व पावसाळी प्रदेशातदेखील एसआरटी ही पद्धत फायदेशीर ठरणारी असल्याने खुद्द राज्य शासनाच्या कृषी विभागाने हे तंत्रज्ञान शेतकरीवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून राज्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे कृषी विभागाने आयोजित करण्यावर भर दिला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) या अंतर्गत दुष्काळप्रवण भागातील कृषी अधिकाऱ्यांना सगुणाबागेत प्रशिक्षण दिले जात आहे. शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण सगुणा रूरल फाउंडेशनच्यावतीने आयोजित केले जाते. त्याचा लाभ शेकडो शेतकऱ्यांनी घेतला आहे. पाऊस कमी असलेल्या भागातील शेतकरी यांच्यासाठी ही नवी पद्धती वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. ‘यंदाचे वर्ष तृणधान्याचे वर्ष’ आहे. तृणधान्याचे महत्व लक्षात घेऊन एसआरटी पद्धतीने त्यांचे उत्पन्न कसे वाढेल यावर अधिक संशोधन सगुणा फाउंडेशन करत आहे. एसआरटी प्रसारासाठी कृषी पदवी आणि पदविका घेणारे असंख्य तरुण शेतकरी या कार्यात सहभागी झाले आहेत. नापिक जमिनीत तणांचे पीक घेऊन तिला सुपिक करण्याचे तंत्र विकसित करण्यावर आता लक्ष्य केंद्रित केले आहे.
एसआरटी तंत्र हे शून्य मशागत, संवर्धित शेतीचा प्रकार आहे. सगुणा राईस तंत्र हे भातशेतीसाठी विकसित झाले असून या पद्धतीने ३० ते ३५ प्रकारची विविध पिके घेता येतात. खरिपात (जून-ऑक्टोबर) भात, नाचणी (नागली), वरी, भूईमुग, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद इ. तसेच रब्बीमध्ये (नोव्हेंबर-फेब्रुवारी) सर्व कडधान्ये उदा. वाल (पोपट), हरभरा, चवळी, काळे मूग, हुलगा (कुळिथ), वाटाणा, मसूर, विविध पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, कोबी, भेंडी, मका, सूर्यफूल, गहू, ज्वारी, करडई इ. व त्यानंतर उन्हाळ्यात (जानेवारी-मे) वैशाखी मूग, भूईमुग, भेंडी, सूर्यफूल, बाजरी अशी फेरपालट पिके घेऊ शकतो. ही पद्धत सगुणा बाग नेरळ (जि. रायगड) येथे सन २०११ ला विकसित झाली आहे. एकूणच या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com