मॉन्सूनपूर्व कामांची बिले थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉन्सूनपूर्व कामांची बिले थांबवा
मॉन्सूनपूर्व कामांची बिले थांबवा

मॉन्सूनपूर्व कामांची बिले थांबवा

sakal_logo
By

05744
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. बाजूला बाळा गावडे, चंद्रकांत कासार, आबा सावंत आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

मॉन्सूनपूर्व कामांची बिले थांबवा

रुपेश राऊळ; रस्ताकामाचा दर्जा पाहूनच निर्णय घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः तालुक्यात १५ मेनंतर सुरू केलेली रस्ता खडीकरण व डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या कामांची बिले अडवून ती पावसाळ्यानंतर कामाचा दर्जा पाहून काढण्यात यावीत, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
या कामांकडे स्थानिक आमदार म्हणून केसरकरांचे लक्ष पाहिजे होते; मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घालून त्वरीत आढावा घ्यावा, अशी मागणीही श्री. राऊळ यांनी केली.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळा गावडे, चंद्रकांत कासार, सरपंच गुणाजी गावडे, आबा सावंत, आबा धुरी, योगेश गावडे, अशोक परब आदी उपस्थित होते.
राऊळ म्हणाले, ‘‘सध्या पालकमंत्री सातत्याने जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याकडेच बांधकाम खाते आहे. पावसाळा जवळ आला असताना ऐन मॉन्सूनच्या तोंडावरच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. एकीकडे १५ मेनंतर रस्त्याची कामे हाती घेतली जात नाहीत, असे प्रशासन सांगते तर दुसरीकडे तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस कामे सुरू आहेत. मुळात ही सगळी कामे घाईगडबडीत सुरू असल्याने ती निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे. तालुक्यात नेमळे, आजगाव, चौकुळ आणि बहुतांशी गावांमध्ये ग्रामस्थांकडून अशी दर्जाहीन कामे अडविली जात आहेत. ही कामे का अडवली जात आहेत? त्याची चौकशी बांधकाम मंत्री यांनी केली पाहिजे. नियमावर बोट दाखवता; मग आता नियम धाब्यावर बसवूनन कामे रेटण्याचा प्रकार का सुरू आहे?’’
श्री. राऊळ पुढे म्हणाले, ‘‘आजगाव-धाकोरे रस्त्याचे काम ठेकेदाराकडून दर्जाहीन झाले आहे. त्यामुळे अशा ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे. जे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार, पालकमंत्री आपण कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याचा गाजावाजा करीत आहेत, त्यांनी इथे लक्ष द्यावा; अन्यथा हा निधी मातीत जाईल. पालकमंत्री चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडेचं सुदैवाने बांधकाम खाते आहे. त्यामुळे याप्रश्नी बांधकाम विभागाच्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन तालुक्यातील सर्व विकासकामे चांगली दर्जेदार व चार वर्षें टिकतील यासाठी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी. ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे केली आहेत, त्यांची बिले थांबवून ठेवावी व पावसाळयानंतर कामाचा दर्जा पाहून ती काढावीत. शासकीय विश्रामगृह व तलावातील गाळ काढण्याचे काम कुठल्या धर्तीवर सुरु आहे, याचाही शोध घेण्याची गरज आहे. पालकमंत्री चव्हाण धडाडीचे मंत्री म्हणून ओळखले जातात, त्यामुळे तालुक्यातील विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी त्यांनी ही धडाडी दाखवावी. दर्जाहीन कामामुळे कोणाचा हकनाक बळी गेल्यास त्याचा मृतदेह बांधकाम कार्यालयात आणून तसेच ज्या-ज्या ठिकाणी पावसाळ्यात निकृष्ट कामे उघडकीस येईल, त्या-त्या ठिकाणी आंदोलन करून बांधकाम विभागाला धडा शिकवू.’’
----------
चौकट
एकट्याने कधीच विकास होणार नाही
येथील स्थानिक आमदाराकडे मीपणा भरपूर आहे. सर्व निधी एकट्यानेच आणला, असे ते सांगत आहेत. जर असे असेल तर शहराचा विकास का खुंटला? जी रस्त्याची कामे सुरू आहेत आणि झाली त्यासाठी निधी हा महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाला होता. केवळ अलीकडच्या कामांनाच युती शासनाच्या माध्यमातून निधी मिळाला; परंतु, त्या ठिकाणी विकास करताना स्थानिक आमदाराने सर्वांना घेऊन विकास करावा. एकट्याने विकास होणार नाही, असेही श्री. राऊळ म्हणाले.
-----------
चौकट
मंत्री केसरकरांवर टीका
मंत्री केसरकर हे आपण खासदारकी लढवणार असल्याच्या पुड्या सोडत आहेत. मुळात केसरकर यांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच ते खासदारकीबाबत बोलत आहेत. अशाने वरिष्ठांवर दबाव आणून विधानपरिषद पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुळात केसरकर खासदार काय आमदार म्हणूनही निवडून येणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना केली.