
सदर-जांभूळ
rat३०११.txt
२४ मे टुडे पान ३ वरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे..
धरू कास उद्योजकतेची .............लोगो
फोटो ओळी
-rat३०p५.jpg ः प्रसाद जोग
------------
जांभूळ ः निसर्गाचा ठेवा त्याचा योग्य उपयोग करायला हवा
निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे. त्या निसर्गसंपदेचा आपण मान राखून योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करायला शिकून घेतले तर आपल्या गावागावात अनेक छोटे-मोठे ग्रामोद्योग उदयाला येऊ शकतात.
आपल्या सर्वांना मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यावरून जाताना दिसणाऱ्या जांभळाच्या जांभळट, निळसर रंगाच्या सड्यामुळे तिथे जांभूळ झाड आहे हे समजून येते अन्यथा हे झाड तसे वर्षभर दुर्लक्षितच राहते; पण हीच खरी शोकांतिका आहे. आंबा, काजू, फणस याप्रमाणे जांभळाच्या बागा कोकणात विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे जांभळाच्या झाडांचे असणारे विकेंद्रीकरण हा अडचणीचा मुद्दा ठरू पाहत आहे.
कोकणात जांभळाची झाडे बऱ्यापैकी असूनही प्रक्रिया उद्योगास साहाय्यभूत ठरू शकत नाहीत, हे वास्तव आहे. यामुळेच जांभळासारख्या प्रक्रियेस उपयुक्त अशा फळावर प्रक्रिया करण्यास मोठा वाव असूनही एक-दोन अपवाद वगळले तर जांभूळ प्रक्रिया उद्योग कोकणात मोठ्या प्रमाणात उभारण्याचे धाडस कोणीही करू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण या फळाचे औषधी गुणधर्म ज्ञात झाल्यानंतर या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्या नवबागायतदार व उद्योजकांसाठी आजचा लेख.
-------प्रसाद जोग
-----------------------
जांभूळ हे औषधी गुणधर्माचे झाड आहे. नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करण्याचा गुणधर्म जांभळात असल्याने व उच्च पोषणतत्त्वे असल्याने मधुमेही रुग्णांसाठी हे झाड म्हणजे कल्पतरूच म्हणायला हवे. जांभूळ पल्प, पाने, बिया, खोड, साल हे सर्वच औषधीदृष्ट्या उपयोगी असल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून जांभूळ बाग विकसित करून प्रक्रिया उद्योग सुरू करणे भविष्यात आशादायी ठरू शकेल. यातूनच आर्थिक उलाढाल वाढून स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील.
सध्याच्या परिस्थितीत जांभूळ प्रक्रिया उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या कोकणातील तरुणांसाठी संधी खालीलप्रमाणे, जांभळाची झाडे आपल्या परिक्षेत्रात किती आहेत याची नोंद ठेवून फळांच्या हंगामात त्यांची योग्य काढणी करून ती जांभळे जवळच्या बाजारपेठेत विक्रीस पाठवणे किंवा त्या फळांवर प्रक्रिया किंवा मुल्यवर्धन करणे. जांभूळ बी गोळा करून त्याची विक्री करणे. आपल्या जवळच्या रसशाळा, आयुर्वेदिक औषधी भांडार यांना भेटी देऊन त्यांच्या गरजेनुसार त्यांना जांभूळ पल्प, रस, अर्क, पाने, साली, खोड उपलब्ध करून देणे. मोठ्या प्रमाणात जांभूळ क्लस्टर सुरू करण्याच्यादृष्टीने गावागावातून प्रचारप्रसार करून जांभळं एकत्रित करण्यासाठी जांभूळ कलेक्शन सेंटर्स उभी करणे. घरगुती स्वरूपात जांभूळ प्रक्रिया उद्योग सुरू करणे. जांभूळबागा तयार करण्याच्या दूरदृष्टीने जांभूळ नर्सरी आपल्या गावात सुरू करून जांभूळ रोपांची व कलमांची विक्री करणे. जुन्या तोडलेल्या जांभळाच्या खोडातून लाकडी पेले बनवून घेऊन त्यांची विक्री करणे. जांभूळ प्रॉडक्टचे डोअर टू डोअर मार्केटिंग करणे किंवा exhibition मध्ये भाग घेणे. जांभूळ वाईन प्रायोगिक तत्त्वावर करता येऊ शकेल, जांभूळ प्रक्रिया करून निर्यात करता येणे शक्य. जांभळांचे, बियांचे निर्जलीकरण करून त्याची भुकटी करणे. महिला बचतगटांना जांभूळ प्रक्रिया उद्योगाचे महत्व समजावून सांगून योग्य प्रशिक्षण देऊन जांभूळ फळाचे मुल्यवर्धन करून स्थानिक पातळीवर उत्पादन क्षमता वाढवणे. जांभूळ पानाच्या राखेत सैंधव मिसळून त्याचे दंतमंजन तयार करता येणे शक्य. जांभूळ वाणांची प्रदर्शन व विक्री. जांभळाच्या झाडांजवळ मधूपेटी ठेवून जांभूळ फुलोऱ्याच्या औषधी मध मधमाशांद्वारे मिळवणे व त्याची विक्री करणे.
* जांभूळ प्रक्रिया उद्योग व्यवहार्य
कोणताही उद्योग सुरू करत असताना आपण बनवत असलेल्या पदार्थांना मागणी असू शकते का, याचा अंदाज उद्योजकाला घ्यायला लागतो. तसा तो जांभूळ प्रक्रिया उद्योगातही घ्यायचे ठरवल्यास आपल्याला या उद्योगातील सामर्थ्य निश्चितच दिसून येईल. कारण, जांभळाचा उपयोग फक्त मूल्यवर्धित खाद्यपदार्थ बनवण्यासाठीच होतो, असे नाही तर तो औषधी गुणधर्माचे पदार्थ बनवण्यासाठीही होत असल्याने त्याला प्रचंड मागणी मधुमेही रुग्णांकडून, खाद्यरसिकांकडून असतेच असते. मधुमेही रुग्णांसाठी जांभूळ हे वरदानच असल्याने ते जांभूळ उत्पादने विकत घ्यायला अनुकुलता दर्शवतात. यामुळेच जांभूळ हे फळ वाया न घालवता त्यावर योग्य प्रक्रिया किंवा मुल्यवर्धन केले तर स्थानिक पातळीवरही जांभळाच्या पदार्थांना चांगला भाव मिळू शकतो. जांभूळ उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागात हा उद्योग करता येऊ शकतो. जांभळापासून जांभूळ गर, पल्प, जांभूळ फ्लेक्स, जांभूळ पावडर, जांभूळवडी, जांभूळपोळी, जांभूळ सरबत, जांभूळ रस, जांभूळ अर्क, सिरप, स्क्वाश जांभूळ गोळी असे पदार्थ तयार करता येऊ शकतात तसेच आईस्क्रिम, बेकरी उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना ही जांभळे विकत देता येऊ शकतात.
*प्रक्रिया उद्योगासाठी
जांभळाची लोकप्रिय वाणे, बहाडोली, राही, गोकाक, जंबो, कोईमतूर १ व काही स्थानिक वाण.
*जांभूळ व्यवसायातील अडचणी
अयोग्य पद्धतीने केलेली काढणी व प्रक्रिया उद्योगाविषयी अनास्था. योग्य मार्केटिंग तंत्राचा अभाव. जांभळाच्या झाडांचे विकेंद्रीकरण. जांभूळ बागा विकसित करण्यामागची अनास्था. जांभूळ या पिकाच्या आर्थिक क्षमतेविषयी योग्य अंदाज न आल्याने त्याकडे काही भागातून होणारे दुर्लक्ष. सिझनल फळ मे, जूनमध्ये प्रक्रियेस तयार होत असल्याने त्याच वेळेत शेतीची कामे असल्याने मजूर उपलब्ध न होणे.
*जांभूळ प्रक्रिया उद्योग सुरू करताना घ्यायची काळजी
मधुमेही रुग्णांसाठी पदार्थ बनवताना त्यात बाहेरून जास्तीचे साखर व मीठ टाकणे टाळावे. स्वच्छतेकडे अधिकचे लक्ष द्यावे. पोषक तत्त्व आपल्या पदार्थात राहतीलच असा फॉर्म्युला सेट करावा. सुरवात अगदी छोट्या प्रमाणात, घरगुती संसाधनांचा वापर करून करावी. या एकाच उद्योगासाठी मोठी कर्ज मिळू शकत नसल्याने जोडधंदा किंवा सिझन बेस बिझनेस म्हणूनच सुरवात करावी. जांभळं गोळा करण्यासाठी आपल्या प्रक्रिया केंद्रापासून जवळ असलेल्या जांभूळ झाडमालकांच्या अगोदर भेटी घेऊन किती जांभळ प्रक्रियेस उपलब्ध होऊ शकतात याचा अंदाज घ्यावा. पडलेली, शिळी, किडकी, कच्ची फळे प्रक्रियेस घेणे आवर्जून टाळावे. तयार मालाच्या पॅकेजिंगकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे. जांभूळ प्रक्रिया उद्योग भविष्यात नक्कीच नावारूपाला येणारा व्यवसाय आहे; पण यासाठी शुन्यातून विश्व निर्माण करायची जिद्द व चिकाटी हवी.
(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)