
पाणीप्रश्नी महिला घागरीसह ग्रामपंचायतीत
05833
माड्याचीवाडी ः रायगाव खालचीवाडी महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात घागर घेऊन धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.
पाणीप्रश्नी महिला घागरीसह ग्रामपंचायतीत
माड्याचीवाडीत प्रशासन धारेवर; नळयोजनेपासूनही वंचित
कुडाळ, ता. ३० ः तालुक्यातील माड्याचीवाडी रायगाव खालचीवाडी येथील विहिरींनी सध्या पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत केलेला जलजीवन मिशनचा सर्वेही चुकीच्या पद्धतीने झाल्याने या वाडीतील ग्रामस्थ योजनेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत या वाडीतील महिला वर्ग व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी माड्याचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घागर घेऊन धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.
रायगाव खालचीवाडी येथे एकच सार्वजनिक विहीर असून ५० हून अधिक कुटुंबे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या वाडीत १० ते १५ खासगी विहिरी आहेत; परंतु यावर्षी पाऊस लांबणीवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई होत आहे. त्यामुळे या वाडीतील सर्वच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. सार्वजनिक विहिरीमध्ये सध्या पाणीच नाही. वाडीतील ग्रामस्थ आणि महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे येथील महिलांची दमछाक होत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून तात्पुरती तरी उपायोजना करण्याची मागणी करण्यात आली.
माड्याचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी घागर घेऊन धडक देत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीटंचाईबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. जलजीवन योजनेंतर्गत योजनेचा वाडीतील लोकांना लाभ मिळावा. प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवराम गावडे यांनी ग्रामस्थांतर्फे केली. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सचिन गावडे, उपसरपंच योगिता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य विघ्नेश गावडे, रेणुका गावडे, अस्मिता गावडे, सागर गावडे, विठ्ठल गावडे, राखी परब, संगीता गावडे, पूजा गावडे, सुधीर कदम, गणेश गावडे, शिवराम गावडे, मनीष गावडे, शेखर गावडे, मधुसूदन धामापूरकर, माजी सरपंच दाजी गोलम, रसिका गावडे, सुगंधा गावडे, संदीप गावडे, अनुराधा परब, जयश्री गावडे आदी उपस्थित होते.
--
प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी
यावेळी सरपंच सचिन गावडे यांनी ग्रामपंचायत निधीमधून हा तात्पुरता प्रश्न सोडविण्याचे कबूल केले. जलजीवन मिशन योजनेंतर्गत या वाडीत संबंधित प्रशासनाकडून चुकीचा सर्वेही केला असून त्यामुळे अद्याप नळयोजना झालेली नाही. रायगावमधील काही ग्रामस्थांना मडगावमध्ये सहभागी केले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे.