
सकारात्मकतेने एकत्रितपणे काम करा
05883
दापोली : येथील कार्यक्रमात नूतन कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मावळते कुलगुरू डॉ. संजय सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
सकारात्मकतेने एकत्रितपणे काम करा
डॉ. उज्वला चक्रदेव; मावळते कुलगुरू डॉ. सावंत यांना निरोप
कणकवली, ता.३० : विद्यापीठात काम करीत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. अनेक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, त्यातील योग्य तो विचार धारण करा, त्या विचारांचा ध्यास बाळगा आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले.
विद्यापिठाचे माळवते कुलगुरू डॉ.संजय सावंत यांना निरोप आणि नवनियुक्त कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांचे स्वागत, असा कार्यक्रम नुकताच दापोली कृषी विद्यापिठामध्ये झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ.चक्रदेव बोलत होत्या. यावेळी डॉ. संजय सावंत, त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणेच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत, शिक्षण संचालक डॉ. बाळकृष्ण देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्माण, कीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक डॉ. विठ्ठल नाईक, विद्यापीठ अभियंता श्री निनाद कुळकर्णी आणि नियंत्रक सौ राजश्री जाधव उपस्थित होते. याप्रसंगी नूतन कुलगुरूंचे स्वागत आणि मावळत्या कुलगुरूंचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रमोद सांवत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनीष कस्तुरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बाळकृष्ण देसाई यांनी आभार मानले.
---
शास्त्रज्ञांकडून बऱ्याच गोष्टी शिकलो
डॉ. संजय सावंत म्हणाले की, ‘‘मला विद्यापीठात जलद प्रजनन तंत्रज्ञान, काळी मिरीची स्वतंत्र लागवड, आंबा घन लागवड, बांबू प्रक्रिया उद्योग, हळद लागवड व प्रकिया आदी अनेकविध कामे करता आली. ही कामे अशीच पुढे चालू राहू द्या. मी विद्यापीठात शास्त्रज्ञांकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. यापुढे आंबा घन लागवड आणि त्यापासून दरवर्षी उत्पन्न या बाबतीत पुढे काम चालू ठेवणार आहे.’’