चिपळूण-वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात होणार वृक्षलागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात होणार वृक्षलागवड
चिपळूण-वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात होणार वृक्षलागवड

चिपळूण-वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात होणार वृक्षलागवड

sakal_logo
By

वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात होणार वृक्ष लागवड

नाम फाउंडेशनचा सहभाग ; ३८ ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण
चिपळूण, ता. ३० ः तालुक्यात वृक्षलागवडीसाठीही नाम फाउंडेशनने आपले योगदान देण्याचा निर्धार केला. त्यानुसार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रातील पूर्वेकडील ३८ ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक प्रजाती देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे.
शासनाकडून चला जाणूया नदीला हे अभियान राबवले जात आहे. या अभियानातून नदी संवर्धनासंदर्भात जनजागृती, नदीचा अभ्यास, समस्या व त्यावरील उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. गेल्या महिन्यात चिपळूण पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानांतर्गत बैठक पार पडली. या वेळी वाशिष्ठी नदीला येणारा पूर तसेच महापुराची अनेक कारणे पुढे आली. यामध्ये साचणारा गाळ हे सुद्धा प्रमुख कारण असल्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली होती. सह्याद्रीच्या खोऱ्यात तसेच वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जमिनीची धूप होते. भूस्खलनासारखी नैसर्गिक आपत्ती ओढावते. पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरची माती नदीत जाऊन वाशिष्ठी नदी व उपनद्या गाळाने भरतात. यावर उपाययोजना करण्यासाठी वाशिष्ठी पाणलोट क्षेत्राच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रजातीची देशी वृक्ष लागवड करण्याचा विषय पुढे आला. यासाठी नाम फाउंडेशनने येथील प्रांताधिकारी पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करत वृक्षलागवडीचा नियोजबद्ध आराखडा तयार करून परिपूर्ण प्रस्ताव नाम फाउंडेशनला पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पांयत समितीने पोफळी, शिरगांव, मुंढेतर्फे चिपळूण, पिंपळी खुर्द, पिंपळी बु., चिंचघरी, खेर्डी, पुंभार्ली, कोंडफणसवणे, अलोरे, कोळकेवाडी, नागवे, पेढांबे, ओवळी, नांदिवसे, स्वयंदेव, राधानगर, खडपोली, तिवरे, रिक्टोली, कादवड, तिवडी, दादर, कळकवणे, आकले, गाणे, वालोटी, निरबाडे, खांदाट पाली, दळवटणे व मोरवणे ग्रामपंचायतींना पत्र पाठवत वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची तपशीलवार माहिती मागितली होती.
--------
चौकट
३२ ग्रामपंचायतींकडून ठेंगा

दरम्यान, अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या या आदेशाला ग्रामपंचायतीकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ग्रामपंचायतींकडून सर्व्हेक्षण करून प्रकल्प अहवाल मागविण्यात आला होता. केवळ सहा ग्रामपंचायतींनी माहिती दिली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याचे दिसून येत आहे. पोफळी, शिरगाव, कोंडफणसवणे, नागावे, पेढांबे, कोळकेवाडी या ६ ग्रामपंचायतींनी गावातील लागवडीसंदर्भात उपलब्ध जमिनीची माहिती दिली. ३८ ग्रामपंचायतीचे सविस्तर प्रस्ताव वेळेत आले असते तर खड्डे मारून पावसाळ्याच्या सुरवातीलाच नियोजनबद्ध वृक्ष लागवड करणे शक्य झाले असते. यावरून वृक्ष लागवडीबाबत उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.