
खेड ः जगबुडी नदीमध्ये गाळाचा थर! पुराचा धोका
जगबुडी नदीमध्ये गाळाचा थर, पुराचा धोका
व्यापाऱ्यांची धास्ती कायम ; गाळ उपशाबाबत नगरपालिकेची केवळ कारणेच
खेड, ता. ३० ः शहरालगतची व ग्रामीण भागातून बारमाही वाहणारी जगबुडी नदी पुरती गाळाने भरली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही जगबुडी नदीतील गाळ अद्यापही उपसलेला नाही. गाळ उपसण्याबाबत नगर प्रशासनाने केवळ कारणे देण्यातच धन्यता
मानली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची यंदाही पुराची धास्ती कायमच राहिली आहे.
अतिवृष्टीदरम्यान जगबुडी नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची हानी होते. पुराच्या
एक-दोन दिवस बाजारपेठ विळख्यात राहिल्यानंतर व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीला समोर जावे लागते. याशिवाय नदीकाठच्या रहिवाशांच्या घरातही पुराचे पाणी घुसून हानी होते. याशिवाय तेथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरही करावे लागते. काही वर्षांपूर्वी जगबुडी नदीतील गाळ उपसल्यानंतर पुराचा धोका टळून व्यापाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता.
सद्यःस्थितीत जगबुडी नदी पुरती गाळाने भरली आहे. नगर प्रशासनाने नदीपात्रातील गाळ उपसण्याची तसदी घेतलेली नाही. शहर व्यापारी संघटनेने नगर प्रशासनाकडे सातत्याने निवेदन देऊनही अद्याप दखल न घेता केवळ कारणे देण्यातच धन्यता मानल्याने पुराच्या धोक्याची टांगती तलवार व्यापाऱ्यांवर कायम राहिली आहे. जगबुडीतील गाळ उपसण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत तातडीने गाळ उपसण्यासाठी प्रांताधिकारी राजश्री मोरे यांना निवेदन दिले होते. मात्र पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असतानाही प्रशासनाकडून गाळ उपसण्याबाबत अद्याप नियोजनच करण्यात आलेले नाही.