
मृत माशांची विल्हेवाट लावल्याने समाधान व्यक्त
05941
सावंतवाडी ः मृत माशांमुळे दुर्गंधी पसरलेल्या सबनीसवाडा परिसरात स्वच्छता करण्यात आली.
मृत माशांची विल्हेवाट
लावल्याने समाधान व्यक्त
सबनीसवाडा परिसर पालिकेतर्फे स्वच्छ
सावंतवाडी, ता. ३० ः तलावातील पाणी सोडल्याने मृत झालेले मासे आज पालिका प्रशासनाकडून उचलून सबनीसवाडासह अन्य परिसरात साफसफाई करण्यात आली. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे दोन दिवस हैराण झालेल्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेतली.
येथील मोती तलावातील गाळ काढण्यासाठी व संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पाणी सोडून तलाव कोरडा करण्यात आला. तलावातील मासे नाल्याद्वारे बाहेर पडल्याने पाण्याअभावी तडफडून मृत झाले. मृत मासे पडून राहिल्याने कुजून परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करून यावर उपाययोजनेची मागणी करण्यात आली. याबाबत लक्ष वेधल्यानंतर खडबडून जागे होत पालिका प्रशासनाने आज सबनीसवाडा परिसरातील नाल्यात तसेच अन्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून मृत मासे उचलले. त्यामुळे दुर्गंधी काहीशी कमी झाली; मात्र अजूनही काही ठिकाणी मृत मासे असल्याने पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.