वंचित तरुणांसाठी नवीन प्रशिक्षण केंद्र

वंचित तरुणांसाठी नवीन प्रशिक्षण केंद्र

वंचित तरुणांसाठी नवीन प्रशिक्षण केंद्र
मुंबई : वांद्रे आणि खार परिसरातील युवकांच्या विकासासाठी एकर सोल्युशन्सच्या सहकार्याने ब्राइट फ्युचरच्या माध्यमातून नवीन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन प्रशिक्षण केंद्रात तरुणांना करिअर समुपदेशन, करिअर मार्गदर्शन सत्र, रोजगार तयारी, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे तरुणांना करिअर निवडण्यासह त्यांची आवड विकसित करणे आणि रोजगारक्षमतेचे कौशल्य वाढविण्यास मदत होणार आहे. एकर सोल्युशन्सची वरिष्ठ व्यवस्थापन टीम आणि ब्राइट फ्युचरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पालवे यांच्या उपस्थितीत खार येथे नुकताच प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. नवीन केंद्र वांद्रे येथे आहे, त्यामुळे खार येथील तरुणांनाही ते सहज उपलब्ध होणार आहे. या नवीन केंद्रात विशेषत: प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या १३ वर्षांत मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे १५ केंद्रे यशस्वीपणे चालवल्यानंतर भारतातील हे ब्राइट फ्युचरचे १६ वे केंद्र आहे.
---
खोदकामांमुळे पुन्हा रस्त्यांची चाळण
उरण ः उरण चारफाटा ते करंजा रस्त्यालगत सुरू असलेले खोदकाम मार्च २०२३ पासून सुरू आहे. या खोदकामामुळे पुन्हा रस्त्याची चाळण होणार असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे करंजा ग्रामस्थांनी या खोदकामाला कडाडून विरोध केला आहे. उरण चारफाटा ते करंजा-अलिबाग असा सागरी मार्गाला जोडणारा उरण तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचा वापर अलिबाग, मुंबई शहराकडे बोटीतून प्रवास करणारे चाकरमानी, प्रवासी करतात. या रस्त्याची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे खड्ड्यांमधूनच नागरिकांना मार्गक्रमण करावा लागत असल्याने करंजा ग्रामस्थांनी शासनस्तरावर यासंबंधीचा पाठपुरावा सुरू केला होता. अनेक वेळा परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन, मोर्चा काढण्यात आले होते. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेऊन उरण चार फाटा ते करंजा रस्त्याचे डांबरीकरणांचे काम सुरू आहे.
---
सेक्स रॅकेट चालवणारी महिला अटकेत
नवी मुंबई : वेश्यागमनासाठी व्हॉट्सॲपद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सीवूड्समध्ये सापळा रचून अटक केली आहे. नवी मुंबईसह परिसरात तीन महिन्यांपासून हे रॅकेट सुरू होते. नेरूळमध्ये राहणारी एक महिला ग्राहकांना व्हॉट्सॲपद्वारे वेश्यागमनासाठी मुलींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती प्रकृती ट्रस्टचा पदाधिकारी अतुल मधुसूदन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संबंधित महिलेशी संपर्क साधण्यात आला होता. यावेळी महिलेने व्हॉट्सॲपवर दोन मुलींचे फोटो पाठवून त्यांचे ४ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षला देण्यात आल्यानंतर ही कारवाई केली गेली होती.
--------
खासगी बसचालकांची उड्डाणपुलाखाली मनमानी
घणसोली ः नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालक रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहने उभी करत आहेत. या प्रकारांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाखाली बस चालकांची हीच मनमानी कोंडीत भर घालत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी खासगी बस चालक प्रवाशांसाठी रस्त्याच्या कडेला वाहने उभ्या करत असल्याचे पाहायला मिळते. या चालकांनी रहदारीच्या रस्त्यांवरच बेकायदा थांबे तयार केले असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. पुणे, सातारा, सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी गाड्या जोपर्यंत भाडे मिळत नाही, तोपर्यंत एकाच ठिकाणी उभ्या केल्या जातात.
--
नागरी समस्या सोडवण्यासाठी साकडे
जुईनगर ः नेरूळ-जुईनगर नोडमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची काँग्रेस शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. यावेळी नेरूळ सेक्टर २ येथील मल:निस्सारण केंद्र हटवून त्याजागी विविध खेळांचा समावेश असलेले क्रीडा संकुलाची निर्मिती करावी, नेरूळ सेक्टर २ येथील स्मशानभूमीलगत अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंडावर डेब्रिज तसेच कचरा हटवून त्या ठिकाणी अग्निशमन केंद्राची निर्मिती करण्यात यावी, नेरूळ सेक्टर ४ महापालिका उद्यानात सीसी टीव्हीची यंत्रणा कार्यरत करावी, अशा विविध मागण्या केल्या गेल्या आहेत.
---
ऐरोली नाक्यावरील बस थांब्यावर कब्जा
वाशी ः ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका येथील नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेचा बस थांब्यावर अतिक्रमण झालेले आहे. बस थांब्याच्या पाठी मागे असणारे गॅरेज व्यावसायिक तसेच रिक्षा चालकांची विनापरवाना पार्किंग केले असल्यामुळे हा थांबा वाहनांनी वेढला गेला आहे. वाशी, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना बस थांबा गॅरेजवाल्यांनी गिळंकृत केल्याने जीव मुठीत घेऊन बसची वाट पहावी लागते. या व्यावसायिकांवर पालिका, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे यादवनगर, चिंचपाडा, ऐरोली नाका, समता नगर, ऐरोली सेक्टर-१ ते २, ऐरोली गाव, महावितरण कॉलनी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
---
वीर सावरकर स्मारकाचे लोकार्पण
घाटकोपर ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला नेहरूनगर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार विभागप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून कुर्ला पूर्व रेल्वे स्टेशन समोर वीर सावरकरांचे स्मारक उभारण्यात आले असून या चौकाचे वीर सावरकर असे नामकरण करण्यात आले आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते वीर सावरकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी शिवसेना तर्फे सावरकर यांची जयंती साजरी करताना विरगित वाजवून सावरकरांचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेना महिला पुरुष पदाधिकारी, युवासैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की, वीर सावरकरांचे शिल्परुपी उभारलेले हे स्मारक प्रत्येकाला स्फूर्ती देणारे असून सावरकरांची विचारधारा आपल्या पक्षाच्या कार्यात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
---
मढ परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव
मालाड ः मालाड पश्‍चिमेतील मढ येथे भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्‍याचे दिसून येत आहे. येथे काही दिवसांपूर्वी दोन मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्‍याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पालिकेने येथील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्‍त करावा, अशीह मागणी नागरिकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी मढ कोळी वाड्यात राहणारी सात वर्षीय राजवी कोळी घरातून बाहेर काही घेण्यासाठी गेली असता गल्लीत असलेल्या भटक्‍या कुत्र्याने तिच्या अंगावर धाव घेत तिचा चावा घेतला. या वेळी नागरिकांनी कुत्र्यांना तेथून हुसकावून लावले. त्‍यापूर्वी एक दिवस अगोदर मढ किनाऱ्यावर एक दहा वर्षाच्या मुलाचापण कुत्र्याने चावा घेतला होता. त्‍या वेळी तेथे उपस्‍थित ग्रामस्थ जॉनी जांभळे व इतरांनी त्या भटक्या कुत्र्यांपासून या मुलाला वाचवले त्यामुळे मोठी घटना टळली.
---
हक्काच्या घरांसाठी नागरिकांचे आंदोलन
शिवडी ः परळ पूर्व भोईवाडा गाव हे गेल्या ३० वर्षांपासून पुनर्विकासाच्या कात्रीत अडकले असल्याने येथील संतप्त नागरिकांनी सरकारविरोधात रविवारी (ता. २८) भोईवाडा नाका येथे आंदोलन केले. आंदोलनाला उपस्‍थित नागरिकांनी सांगितले की, सरकारकडून वेळोवेळी आम्‍हाला पुनर्विकासाचे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र ठोस पावले उचलली जात नाहित. याचा निषेध आम्‍ही काळ्या फिती लावून करत आहोत. वेळीच सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर अधिक तीव्र स्‍वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी नागरिकांकडून देण्यात आला.
---
ईदनिमित्त भरणार बकऱ्यांचा बाजार
मुंबई ः बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या देवनार पशुवधगृहात १६ ते ३० जूनदरम्यान जिवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचा बाजार भरणार आहे. त्यासाठी बकरी ईदच्या दिवशी आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवध करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.
डॉ. पठाण यांनी सांगितले, की बकरी ईद सणाबाबत महापालिकेच्या वतीने संबंधित सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १६ जून रोजी सकाळी सहापासून ३० जून रोजी सायंकाळी सहापर्यंतच्या कालावधीदरम्यान जिवंत म्हैसवर्गीय प्राणी देवनार पशुवधगृहात परवाना प्राप्त करून आणता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com