
कोतवडेत देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
कोतवडेत देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे-बाजारपेठ येथे देशी मद्याची विक्री करण्याऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश विठ्ठल मयेकर (रा. कोतवडे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 29) रात्री साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. कोतवडे-बाजारपेठ येथे देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे 490 रुपयांच्या देशी दारूच्या सात बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
बाथरूममध्ये पडलेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी ः बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमिला प्रभाकर जाधव (वय 66, रा. निवेंडी भगवतीनगर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला या रविवारी (ता. 28) घरातील बाथरूममध्ये पडल्या. उपचारासाठी बहीण व शेजाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून मालगुंड प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला.