
चिपळूण ःबहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडी फुटणार
ratchl३११.jpg
०६०६३
चिपळूणः बहादूरशेखनाक्यातील वाहतूककोंडीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारताना मनसे पदाधिकारी.
------------
बहादूरशेख नाक्यातील वाहतूक कोंडी फुटणार
मनसे सैनिकांची धडक ; महामार्ग कार्यालयावर धडकेनंतर कार्यवाही सुरू
चिपळूण, ता. ३१ः मंत्र्यांच्या पाठी फिरा नाहीतर नेते किंवा ठेकेदाराच्या पाठी. पहिल्यांदा बहादूरशेख नाक्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. तत्काळ वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघालाच पाहिजे, असा इशारा मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसे सैनिकांनी महामार्ग विभागाच्या कार्यालयाला दिला. यावर तत्काळ कार्यवाही सुरू झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. गेली ३-४ महिने बहादूरशेख येथे सकाळ-संध्याकाळ आणि कधी कधी दुपारीसुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. खेड किंवा खेर्डीकडे जाताना वाहनचालकांची दमछाक होते. त्यामध्ये किरकोळ अपघातही घडू लागले आहेत. बहादूरशेख नाक्यातून खेडकडे जाण्यासाठी फक्त सिंगल गाडी जाईल, असा रस्ता ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित म्हणजेच रस्त्याच्या बाजूला ठेकेदार कंपनीने बॅरिकेट लावून ठेवले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी काम सुरू नाही; मात्र तरीही रस्ता सिंगल गाडी जाईल अशाच पद्धतीने ठेवल्याने येणारी गाडी पास होत नाही. परिणामी, पाठोपाठ गाड्यांच्या रांगा लागतात आणि बहादूरशेख चौक चारी दिशांनी गाड्यांनी भरून जातो. केवळ आडमुठी धोरणामुळेच वाहनचालक आणि जनतेला वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे मनसेचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले, तालुकाध्यक्ष अभिनव भुरण, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सहकार संघटक संतोष कदम, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, प्रशांत हटकर, संघर्ष समिती सदस्य मंगेश महाडिक रूपेश शेट्टे आदी पदाधिकाऱ्यांसह मनसैनिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.
या वेळी संबंधित अधिकारी हे मंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते, तर उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता येत नव्हते. यामुळेच मनसे सैनिक आक्रमक झाले. तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकारी कुलकर्णी यांना संपर्क साधून चौकशी केली असता मंत्र्यांच्या दौऱ्यात असल्याचे समजले. मनसे सैनिकांचा पारा चढला. त्यांनी आक्रमक भूमिका घेताच संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यावर न थांबता संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना घेऊन अनावश्यक असणारे बॅरिकेट काढण्यात आले. एकेरी मार्गाऐवजी आता तात्पुरत्या स्वरूपात डबल वे करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याचे काम सुरू झाले आहे.