शेर्ले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ः मडुरा उपसरपंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेर्ले रस्त्याचे काम तातडीने 
पूर्ण करा ः मडुरा उपसरपंच
शेर्ले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ः मडुरा उपसरपंच

शेर्ले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ः मडुरा उपसरपंच

sakal_logo
By

06114
ओरोस ः निबंध स्पर्धेतील विजेती शुभांगी लोहार हिला गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

निबंध स्पर्धेतील विजेती शुभांगीचा
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी लोहार हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले. शुभांगी हिने सावंतवाडी शाखेच्या वसतिगृहातर्फे स्पर्धेत भाग घेतला. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते हस्ते परेड मैदान, ओरोस येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सूरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर, डॉ. शरावती शेट्टी व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
---
06179
शेर्ले ः येथे खडीकरणासाठी टाकण्यात आलेले साहित्य. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘शेर्ले रस्त्याचे काम पूर्ण करा’
बांदा ः जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व सरी कोसळायला सुरुवात झाल्या असून मॉन्सून अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेर्ले येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण काम पूर्ण क्षमतेने करावे, अशी मागणी भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाळा कधीही सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांची मागणी असलेले शेर्लेतील रस्त्याचे काम अधिक जलदरित्या करावे. काम सुरू असताना पाऊस आल्यास साहित्यासह निधी वाया जाईल. परिणामी काम अर्धवट स्थितीत राहून याचा त्रास मडुरा पंचक्रोशीसह प्रवासी, वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. काही काम झाले असून काही शिल्लक आहे. बांधकाम विभागाने पूर्ण क्षमतेने पावसाळ्यापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी उपसरपंच गावडे यांनी केली आहे.
..............
‘तळकट-पडवे माजगाव रस्ता दुरुस्ती करा’
दोडामार्ग ः तळकट-पडवे माजगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. रस्त्यावर जागोजागी पसरलेली खडी अपघातास निमंत्रण ठरत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, याकरिता उपोषण करण्यात येणार असल्याचे तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी लवकरच सांगितले. या रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या‍ दुचाकी चालकांना एवढी कसरत करावी लागते की, हा रस्ता टाळून बांदा येथे जाण्यासाठी कळणे-उगाडे रस्त्याचा पर्याय बऱ्या‍च ग्रामस्थांनी स्वीकारला आहे; मात्र हे अंतर झोळंबे व अन्य गावांना जास्त अंतराचे होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या रस्त्याची आठ दिवसांत खड्डे बुजवून दुरुस्ती न झाल्यास दोडामार्ग उपअभियंता यांना कार्यालयातच घेराओ घालण्याचा इशारा सरपंच सावंत यांनी दिला आहे.
---
घोटगेत शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे
कुडाळ ः घोटगे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यां‍ना सुधारित भाताची बी-बियाणे पुरवणे व शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच चैताली ढवळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. कृषी अधिकारी परब यांनी भातशेतीची लागवड कशी करावी, याबद्दल माहिती दिली. ही संकल्पना राबिवण्यामागील उद्देश सरपंच ढवळ यांनी स्पष्ट केला. भात बियाणे मोफत देऊन निदान शेतकरी एक किलो तरी बियाणे आपल्या शेतात पेरणी करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेतील. आता बहुतांशी शेत जमिनीचा भाग हा पडीक झाला आहे, हे पाहता हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य लॉरेन्स मान्येकर, उपसरपंच सचिन तेली, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गुरव, विजय नाईक, रमाकांत कोरगावकर, अनुसया ढवळ, लतिका गुरव, शीला मान्येकर, दीपाली सांवत, जयश्री मडवळ, ग्रामसेवक भोगले व शेतकरी उपस्थित होते.
---
कणकवली शहराला पाणीटंचाईची झळ
कणकवली ः शहरातील नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पाणी टंचाईची झळ बसणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील पाणीसाठा संपल्याने टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे एक जून पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे म्हटले आहे की, ‘‘शिवडाव धरणातून पाणी उपलब्ध झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. नागरिकांना व नळ कनेक्शन धारकांना या पाणीटंचाईसाठी अडचण निर्माण होणार आहे; पण नगरपंचायतीला सहकार्य करावे,’’ असे आवाहन केले आहे.
---
शालेय साहित्याच्या दरात लक्षणीय वाढ
कणकवली ः नवीन शैक्षणिक वर्षाला येत्या १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गणवेश, दप्तर बॅग, वह्या, पुस्तके आदींसह विविध प्रकारची स्टेशनरी व शालेय साहित्य उपलब्ध झाले आहे. विद्यार्थी व पालकही वह्या पुस्तकांबरोबरच आवश्यक साहित्य खरेदी करताना दिसून येत आहेत; मात्र यावर्षी वह्या, पुस्तके व अन्य स्टेशनरीच्या दरात सरासरी १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. साहजिकच याची झळ पालकांच्या खिशाला बसत आहे. दैनंदिन महागाईने होरपळलेल्या नागरिकांना शालेय साहित्य दरात झालेली वाढ आणखीनच मनस्ताप देणारी आहे. स्कूलबॅग, रेनकोट, छत्री, पावसाळी बूट आदींच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
----
पाणी बचतीचे मालवणात आवाहन
मालवण : महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे धामापूर नळ पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण सुरळीत करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. नागरिकांनी पाणी बचत करून जपून वापरावे व पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
--
निवृत्त सेवकांची मालवणात रविवारी सभा
मालवण : मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.