
रत्नागिरी बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक
rat३१p२१, rat३१p२२.jpg
०६१९२, ०६१९१
रत्नागिरीः कुवारबाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद.
------
बॅंकेचे एटीएम फोडण्याचा
प्रयत्न, दोघांना अटक
सीसीटीव्हीमध्ये कैद ; एक जयसिंगपूरचा, दुसरा राजस्थानचा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ः शहराजवळील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबावचे एटीएम फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ते परजिल्ह्यातील आहेत. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईचे शहरातील बॅंकेच्या ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सूरज अमर मोटे (वय २१, रा. १७ वी गल्ली महात्माफुले भाजी मंडईच्या समोर जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व गिरीराज भजनलाल गुर्जर (वय २१, रा गाव बडेडा पोस्ट खटपुरा, जि. सवाई म्हादुपूर, राज्य राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास बॅंक ऑफ महाराष्ट्र कुवारबाव शाखा येथे घडली. संशयितांनी धारदार हत्याराने एटीएम मशीन उचकटून एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे मिळाले नाहीत, म्हणून एटीएम मशीनचा दरवाजा व मशीनवरील कॅमेरा फोडून नुकसान करून तेथून पळ काढला. या प्रकरणी बॅंकेचे शाखा मॅनेजर कैलास महादेव रहाडे (वय ३५, मुळ रा. बीड, सध्या रा. राजेंद्रनगर, थिबापॅलेस, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.
दरम्यान, हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता आणि बॅंक मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ चोरट्यांना पकडण्यासाठी चक्रे फिरविली. चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले होते. प्रथम पोलिसांनी शहरातील काही भाग रातोरात पिंजून काढला. पसार झालेल्या चोरट्यांच्या मुसक्या रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून आवळल्या. चोरट्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला व पैसे मिळाले नाहीत म्हणून मशीनवरील कॅमेरा फोडल्याची कबुली दिली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.