
नंदकुमार पेडणेकरांना ‘स्वामीरत्न’
06219
पुणे ः येथे नंदकुमार पेडणेकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
नंदकुमार पेडणेकरांना ‘स्वामीरत्न’
देवगड ः जोगेश्वरी (मुंबई) येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार संचलित तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना ‘स्वामीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. पेडणेकर हे जामसंडे खाकशी येथील सुपुत्र आहेत. पेडणेकर यांना त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन अक्कलकोट येथील श्री समर्थनगरी आध्यात्मिक राज्यस्तरीय समितीच्यावतीने ‘स्वामीरत्न’ पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात अक्कलकोट येथील स्वामी महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि चोळाप्पा महाराजांचे वंशज अन्नू गुरुजी यांच्या हस्ते पेडणेकर यांना ‘स्वामीरत्न पुरस्कार २०२३’ देऊन सपत्नीक गौरविण्यात आले.
................
विजेच्या लपंडावामुळे मालवणवासीय त्रस्त
आचरा : पावसाच्या वातावरणानेच आचरा गावात कालपासून (ता. ३०) विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांसोबत व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे. तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी बांधवांनी दिला आहे. आचरा भागात पाऊस पडला नसला तरी कालपासून अधूनमधून पावसाळी ढग दाटून येत पावसाळी वातावरण बनत आहे; मात्र पावसाळी वातावरणानेच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने पावसाळ्यात वीज समस्या आणखीन उग्र बनण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात असून विद्युत समस्या तातडीने दूर न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.