आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्य शिबिर
आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्य शिबिर

आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

swt13.jpg

आडाळीः ग्रामपंचायतीने घुंगुरकाठी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या आयुर्वेदीक तपासणी शिबिरात बोलताना सरपंच पराग गावकर. व्यासपिठावर उपस्थित डॉ. सई लळीत, कांचन विरनोडकर, डॉ. प्रसाद नार्वेकर, डॉ. समीर पै व अन्य.

आयुर्वेदाच्या प्रसारासाठी आरोग्य शिबिर
पराग गावकरः आडाळीत ग्रामपंचायत, ''घुंगुरकाठी''तर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः आयुर्वेद ही फक्त उपचारपद्धती नसून ती भारतीय परंपरेतील प्राचीन जीवनशैली आहे. तिचा प्रसार व्हावा, यासाठीच आम्ही आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन आडाळीचे सरपंच पराग गावकर यांनी केले.
आडाळी (ता. दोडामार्ग) येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या शिबिरात वैद्य समीर पै, प्रसाद नार्वेकर, कांचन विरनोडकर, सई लळीत यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत, ग्रामसेवक कुणाल मसगे उपस्थित होते. शिबिराच्या सुरुवातीला श्री. गावकर यांच्याहस्ते सर्व वैद्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात १०६ रुग्णांची तपासणी करुन त्यांना आयुर्वेदिक औषधे देण्यात आली.
आयुर्वेदिक शिबिर आयोजित करण्यामागची भुमिका स्पष्ट करताना श्री. गावकर म्हणाले, ‘‘आयुर्वेदिक उपचारपद्धती ही आपली प्राचीन परंपरा आपण विसरत चाललो आहोत. आधुनिकीकरणाचा अवलंब करताना आपण आवश्यकता नसताना अनेक प्रकारची औषधे घेतो. कोणतेही अपाय नसलेली व खात्रीची ही उपचारपद्धती आहे. यामुळे जाणीवपूर्वक हा निर्णय आम्ही घेतला.’’
श्री. नार्वेकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत आयुर्वेदाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपली जीवनशैली बदलली आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. धावपळ, दगदग वाढली आहे. अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक तणावांना, विविध रोगांना प्रत्येकाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वांना पुरुन उरण्याची ताकद आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये आहे. जास्तती जास्त नागरिकांनी आयुर्वेदाकडे वळण्याची गरज आहे. यादृष्टीने शिबिराचा अपक्रम अनुकरणीय आहे.’’
घुंगुरकाठीचे अध्यक्ष लळीत म्हणाले, ‘‘आडाळी ग्रामपंचायतीने एक चांगला पायंडा पाडला आहे. अलिकडे धावपळीच्या युगात आपण प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो. रोगावर तात्पुरते उपचार करतो आणि रोग बळावल्यावर आयुर्वेदाकडे वळतो. असे न करता रोगाच्या प्राथमिक टप्प्यातच उपचार केले तर खुप फायद्याचे ठरते. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय बरे करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्याचा आडाळी ग्रामपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळेच या शिबिराला आवश्यक ते अहकार्य करण्याचा निर्णय आमच्या संस्थेने घेतला आहे.’’
ग्रामसेवक कुणाल मसगे यांनी आभार मानले.

चौकट
आयुर्वेद उपचारपद्धती फायदेशीरः सई लळीत
सई लळीत म्हणाल्या, आहार, विहाराच्या बदललेल्या सवयी, फास्ट फुड यामुळे आपले प्रकृतीमान बिघडत चालले आहे. विविध प्रकारचे तणाव वाढत आहेत. यावर तात्पुरते उपचार करुन चालणार नाही. रोगाच्या मुळाशी जाऊन रोगाबरोबरच तो होण्याची कारणे यांचा नाश करण्याचे काम आयुर्वेद करतो. आयुर्वेद हा केवळ आजारावरील उपचारपद्धती आहे, असे नव्हे तर निरोगी व्यक्तीचा निरोगीपणा कायम टिकावा, प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठीही ही उपचारपद्धती फायदेशीर आहे.