
राजापूर-रेशीम उद्योगासाठी कोकणातील वातावरण पोषक
फोटो ओळी
- rat१p७.jpg- KOP२३M०६२९६ राजापूर ः सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलेले रेशीम शेती करणारे शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, हनुमंत विचारे आणि सुधीर पालकर यांच्यासह प्रगतशील शेतकरी नामासाहेब जाधव, सुहास पंडीत, विजय चव्हाण आदी.
-------------
रेशीम उद्योगासाठी कोकणातील वातावरण पोषक
नानासाहेब जाधव ; राजापुरात कृषी मेळावा
राजापूर, ता. १ : कमी कालावधी आणि कमी गुंतवणुकीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारे रेशीम उद्योग व्यवसाय आहे. नाविन्यपूर्ण असलेल्या रेशीम उद्योगासाठी कोकणातील वातावरण पोषक असून कोकणातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी रेशीम उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन नाशिक येथील प्रगतशील रेशीम शेतकरी नानासाहेब जाधव यांनी केले.
पंचायत समिती कृषी विभाग, राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी आणि स्नेहरत्न कृषी संघ राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहामध्ये कृषी मेळावा झाला. या वेळी कृषी अधिकारी सुहास पंडित, स्नेहरत्न कृषी संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण, राजापूर तालुका उत्पादन कंपनीचे एम. डी. मंदार नार्वेकर, संचालक पुनाजी गुरव, डॉ. भारती वरेकर, कृषी विभागातील विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदी उपस्थित होते.
श्री. जाधव यांनी तुती शेतीसह रेशीम उद्योगाविषयी सविस्तर माहिती दिली. कमी कालावधीमध्ये, कमी गुंतवणुकीमध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा असा फायदेशीर उद्योग कसा आहे यासंबंधी माहिती दिली. कोकणातील वातावरण रेशीम व्यवसायासाठी पोषक असून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यास आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजापूर-लांजा तालुक्यामध्ये रेशीम उद्योग, तुती शेती करणार्या शेतकर्यांचे त्यांनी कौतुक केले. कृषी अधिकारी श्री. पंडित यांनी हमखास उत्पन्न मिळवून देणार्या शेतीक्षेत्रासह त्यातील नवनवीन संधीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राजापूर तालुका उत्पादन कंपनीचे एमडी श्री. नार्वेकर यांनी कंपनीच्या माध्यमातून शेतीक्षेत्राला कशी चालना दिली जात आहे, भविष्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबविले जाणार आहेत आदींविषयी सविस्तर माहिती देताना कंपनीच्या माध्यमातून सर्वांनी संघटीत होत शेतीची कास धरण्याचे आवाहन केले. मेळाव्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून रेशीम शेती करणार्या शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, हनुमंत विचारे आणि सुधीर पालकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.