रत्नागिरी-जाकादेवी बॅंक दरोड्यातील तिघांना जन्मठेप

रत्नागिरी-जाकादेवी बॅंक दरोड्यातील तिघांना जन्मठेप

पान १ साठी

०६३८८

जाकादेवी बॅंक दरोड्यातील तिघांना जन्मठेप
तिघांची पुराव्याअभावी सुटका; नऊ वर्षांनी निकाल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः राज्यभर गाजलेल्या तालुक्यातील जाकादेवी सेन्ट्रल बॅंक दरोडा खटल्यातील ६ पैकी तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. उर्वरित तिघांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. दरोड्यामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. आरोपींनी बॅंकेतील ६ लाख रोकड लुटल्याचा त्यांच्यावर आरोप होता. नोव्हेंबर २०१३ ला हा दरोडा पडला होता. नऊ वर्षांनंतर मृत आणि जखमीला न्याय मिळाला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी हा निकाल दिला. आरोपी राजेंद्र नवलकिशोर राजावत (२५, कल्याण, मूळ मध्य प्रदेश), प्रशांत प्रभाकर शेलार (२३, रा. डोंबिवली पूर्व), निखिल मारुती सावंत (२४, डोंबिवली) यांना जन्मठेप सुनावली आहे. राजावत याला जन्मठेप व ६५ हजारांचा दंड व प्रशांत शेलार आणि निखिल सावंत यांनी ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. खटल्यातील हरिष गिरी गोस्वामी (२५, कल्याण), प्रथमेश संतोष सावंत (१८ राई -भातगाव, रत्नागिरी), शिवाजी उर्फ सागर बाळू विखे (२५, कल्याण पूर्व) या तिघांची सबळ पुराव्याआभावी मुक्तता केली. ही घटना २८ नोव्हेंबर २०१३ ला जाकादेवी सेन्ट्रल बॅंकेच्या शाखेत दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली होती.
आरोपींनी दरोडा टाकण्याच्या एक दिवस आधी बँकेच्या परिसराची रेकी केली होती. २८ नोव्हेंबरला दुपारी दीडच्या सुमारास आरोपींनी तोंडाला रुमाल आणि डोक्यावर टोपी, असा पेहराव करत मोटारीमधून बॅंकेत प्रवेश करीत दरोडा टाकून तेथील शिपाई आणि कर्मचाऱ्यावर गोळीबार करून रोकड घेऊन पळ काढला होता. गोळीबारात बँकेचे कर्मचारी संतोष शांताराम चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. शिपाई सुरेश गुरव गंभीर जखमी झाले होते.
बँकेत प्रवेश केल्यावर मुख्य आरोपी राजेंद्र सिंग राजावतने प्रथम बँकेचे शिपाई सुरेश गुरव यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर इतर खातेदारांना आणि कर्मचाऱ्यांना धमकावत रोख ६ लाख ८८ हजार रुपये लुटत कर्मचारी संतोष चव्हाण (रा. धामणसे) यांच्यावर राजावतने दुसऱ्यांदा गोळीबार केला. चव्हाण यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींना बँकेतून बाहेर पडत मोटारीने पळ काढला होता. याप्रकरणी मॅनेजर अलका कविश्वर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा बहुतांश तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी तुषार पाटील आणि त्यानंतर अशोक बनकर यांनी केला. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांना या तपासात लक्ष घालून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. ग्रामीण पोलिसांनी आरोपींना मुंबईतून अटक करून त्यांच्याकडून रोकड हस्तगत केली होती.
खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी एकूण ३४ साक्षीदार तपासले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी मुख्य आरोपी राजावतसह प्रशांत शेलार आणि निखिल सावंत या तिघांना भादंवि कलम ३९६, ३९७ अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, तो न भरल्यास २ वर्ष साधी कैद, भादंवि कलम ४४९ सह ३४ अन्वये ७ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधी कैद, भादंवि कलम ४५२ सह ३४ अन्वये ५ वर्ष सक्तमजुरी ५ हजार रुपये दंड तो न भरल्यास ६ महिने साधी कैद, तसेच मुख्य आरोपी राजावतला हत्यार कायदा कलम २५ (१) (१ बी ) अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड सुनावला. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस फौजदार अनंत जाधव आणि सुनील आयरे यांनी काम पाहिले. १५ दिवसांत पोलिसांनी सहा गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. नऊ वर्षांनंतर मृत व जखमीला न्याय मिळाला असल्याचे अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजवरून मिळाला धागा
संबंधित वृत्त पान ३ वर


दृष्टिक्षेपात
गोळीबारात एकाचा मृत्यू, एक गंभीर
दरोड्यापूर्वी केली होती रेकी
आरोपींना मुंबईतून केली अटक
३४ साक्षीदार तपासले
६ लाख ८८ हजारांची लूट

एका आरोपीला अश्रू अनावर
न्यायालयात एका आरोपीला अश्रू अनावर झाले. मी नसेन तर माझ्या आई-वडिलांचे काय? अशी याचना केली. मात्र, जामिनासाठीची वेळ निघून गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com