कोयना जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्याने ट्रेकर्सची दमछाक

कोयना जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्याने ट्रेकर्सची दमछाक

कोयनेतील पाणी घटल्याने ट्रेकर्सची दमछाक
जलाशयात बोटींगऐवजी पायपीट वाढली; असह्य उकाड्याने हैराण
चिपळूण, ता. २ : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे वासोटा किल्ल्याच्या ट्रेकिंगला जाताना नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढल्याने ट्रेकर्सची दमछाक होत आहे.
कोयना धरणाच्या बॅकवॉटरने तयार झालेला शिवसागर जलाशय नेहमीच पर्यटक व निसर्गप्रेमींना भुरळ घालतो. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कोयना अभयारण्याचे घनदाट जंगल व त्यात शिवसागराचे निळेशार पाणी यामुळे हा परिसर ॲमेझॉनच्या जंगलाची प्रतिकृती भासतो. तापोळा, बामणोली, मुनावळे येथील बोटिंगचा थरार, ऐतिहासिक वासोटा, महिमंडनगड किल्ले तर दुर्गम कांदाटी खोऱ्यातील चकदेव, पर्वत, उतेश्वर, नागेश्वर ही स्वयंभू शिवलिंग आहेत. यामुळे पर्यटनासाठी हा परिसर समृद्ध आहे. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक ट्रेकर्स या भागात ट्रेकिंग करतात. तसेच मोठ्या शहरातील लोक सुट्टीच्या दिवशी ट्रेकिंगसाठी आल्यानंतर त्यांना गाईड म्हणून मदत करतात.
उन्हाळ्याच्या तीव्र झळा व विजेची, सिंचनाची वाढती मागणी यामुळे कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती करण्यात आली. त्यासाठी साडेसात टीएमसी पाणी वापरल्याने धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. वासोटा किल्ला ट्रेकिंगसाठी अजूनही ट्रेकर्स येत आहेत. परंतु पाणीपातळी कमी झाल्याने नदीपात्रातील दोन किमीचे अतिरिक्त अंतर चालावे लागत आहे. येथे बोटिंगची सोय आहे, परंतु नदीपात्र कोरडे पडल्यामुळे दोन किमी अंतरापर्यंत बोटिंग करता येत नाही. त्यात उन्हाची तीव्रता यामुळे चालणाऱ्यांची दमछाक होत आहे.

कोट
कुंभार्ली, कोळकेवाडी, तिवडी, नंदिवसे, तिवरेच्या जंगलातून ट्रेकिंगला सुरुवात होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतून ट्रेकिंगला सुरुवात करताना सातारा जिल्ह्यात बाहेर पडतो. जंगलात अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. त्यामुळे रात्रीचा मुक्काम करता येतो. लोक शनिवारी आणि रविवारी ट्रेकिंग साठी मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या धरणात पाणी कमी झाल्यामुळे बोटिंग करता येत नाही. त्यामुळे पायी चालण्याचे अंतर वाढले आहे.
- बबन शेलार, कोळकेवाडी, गिर्यारोहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com