ओशिवरा नदीची संरक्षक भिंत 
तुटल्यामुळे रहिवाशांना धोका

ओशिवरा नदीची संरक्षक भिंत तुटल्यामुळे रहिवाशांना धोका

ओशिवरा नदीची संरक्षक भिंत
तुटल्यामुळे रहिवाशांना धोका
मुंबई ः गोरेगावच्या ओशिवरा नदीची जवाहर नगरच्या झोपडपट्टीशेजारील संरक्षक भिंत तुटल्याने शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात आला असल्याचा दावा माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी परिसराची पाहणी केली. पालिकेने तत्काळ भिंत न बांधल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी पाहणीनंतर दिला. पावसाळा तोंडावर आला, तरी ओशिवरा नदीमधील गाळ काढण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ओशिवरा नदीवरील रेल्वेपुलाखाली मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. नदीची संरक्षक भिंत तुटल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी वसाहतीत शिरण्याचा धोका आहे. त्याबाबतची माहिती महापालिका स्थानिक कार्यालयात देण्यात आली आहे. पालिकेच्या मध्यवर्ती केंद्राकडेही तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.
---
इतर सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवीधर वगळून प्राचार्य, संस्थांचे संचालक प्रतिनिधी, अध्यापक आणि व्यवस्थापन परिषदेच्या सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पदवीधर मतदार याद्या आणि त्यातील काही त्रुटी राहिल्याने त्यासाठीचा कार्यक्रम थोड्या दिवसांनी जाहीर केला जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या मतदारसंघासाठी उमेदवारांना ७ जूनपर्यंत अर्ज करावे लागतील. त्या अर्जांची छाननी १२ जूनपर्यंत होईल. त्यानंतर उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबतचे आक्षेप १४ जूनला नोंदविता येतील. १७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. विद्यापीठाकडून निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी १९ जूनपर्यंत जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबई विद्यापीठातील सिनेटमधील दहा प्राचार्य, प्राचार्य आणि मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक यांच्यासह दहा अध्यापक, विद्यापीठ अध्यापक तीन, व्यवस्थापन प्रतिनिधी सहा, विद्या शाखेचे प्रतिनिधित्व करणारे दोन, अभ्यास मंडळावरील तीन विभागप्रमुख इत्यादी जागांच्या निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.
--
खड्ड्यांच्या कामांवर दक्षता विभागाची नजर
मुंबई ः मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामाला वेग आला आहे. खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चूनदेखील वारंवार खड्डे होतात. या वेळी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवर महापालिकेच्या दक्षता विभागाची करडी नजर राहणार आहे. खड्ड्यांमध्ये चुकीच्या किंवा भेसळयुक्त साहित्याचा वापर केल्यास दोषींना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिला आहे. मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये योग्य साहित्य वापरले की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महापालिकेच्या दक्षता विभागाची आहे. दक्षता विभाग साहित्याचे नमुने गोळा करून वरळी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतो. तपासणीत अनियमितता आढळून आल्यास जो कोणी दोषी असेल, मग तो पालिका अधिकारी असो वा ठेकेदार, त्याच्यावर दंड आकारला जातो. त्याशिवाय काळ्या यादीत टाकणे किंवा गुन्हा दाखल करणे अशा कारवायादेखील होऊ शकतात, असे अजित कुंभार म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षात विकासकामांच्या चौकशीत दोषींकडून १३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. रस्ते व पूल विभागाकडे सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. आताही खड्डे भरण्याच्या साहित्यावर आमचे लक्ष असेल, असेही ते म्हणाले.
-----
कर्मचारी वसाहतीची लवकरच पुनर्बांधणी
मुंबई ः कुलाबा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील कर्मचारी वसाहतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबंधित जागी असलेल्या इमारती पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. प्रस्तावित इमारतींचे संरचनात्मक आराखडे बनविण्यासाठी आणि प्रकल्प व्यवस्थापनाकरिता सल्लागार मेसर्स मास्टर अॅण्ड असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी ७० कोटी खर्च केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना ७० सदनिका उपलब्ध होणार आहेत. सदर कामाचे आराखडे महापालिका वास्तुशास्त्रज्ञ व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी तयार केले आहेत. आराखड्यानुसार स्टिल्ट अधिक सहा मजले इमारतीची बांधणी करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावातील एका इमारतीमध्ये एकूण तीन विंग आहेत. एका इमारतीअंतर्गत तीन विंग बांधण्यात येणार असून प्लॉट क्षेत्रफळ २५५१.८९ चौ. मी. आहे. त्यात ११४.३८, ७१.००, ३०.०८ आणि १०२.७ चौ. मी.च्या सदनिका आहेत.
--
गळतीवर ताडपत्रीचा आधार
प्रभादेवी : मुंबईत सध्या सर्वच पातळीवर पावसाळापूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. विविध चाळी आणि झोपडपट्यांमध्ये पावसामुळे होणारी गळती थांबावी म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ताडपत्रीची खरेदी सुरू झाली आहे. घराच्या छतावर ताडपत्री टाकण्याची लगबग सुरू झाली आहे. चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांबरोबरच छोट्या-मोठ्या दुकानदारांना पावसाळ्यात होणारी गळती टाळण्यासाठी ताडपत्रीचा मोठा आधार वाटतो. सध्या दादर, परळ, धनमिल नका इत्यादी परिसरात अनेक रंगांतील आणि विविध आकारांतील टिकाऊ ताडपत्री वा ग्रीन नेट विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. वाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने यंदा ताडपत्रीच्या किमतीही वाढल्या आहेत. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या निरनिराळ्या आकाराच्या आणि कमी-जास्त जाडीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी उपलब्ध असून खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
---
अपहरणाचा बनाव करणाऱ्या तरुणाला अटक
अंधेरी ः कर्जबाजारी झालेल्या एका २७ वर्षांच्या तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून पत्नीसह वडिलांकडे सुटकेसाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या पाच तासांत बांगुरनगर पोलिसांनी एका मोठ्या रिटेल शॉपचा मॅनेजर असलेल्या जितेंद्र जोशी याला अटक केली. त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दिनेशलाल जोशी यांचा मोठा मुलगा जितेंद्र बुधवारी दुपारी कामावर गेला. मात्र, रात्री घरी आला नाही. दरम्यान त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर एकाने व्हॉटस््अॅप कॉल करून जितेंद्रचे अपहरण झाल्याचे सांगून त्याच्या सुटकेसाठी पाच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर जितेंद्रच्या कुटुंबीयां बांगूरनगर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून जितेंद्रची सुटका केली.
---
५० लाखांच्या ड्रग्जसह दोघांना अटक
अंधेरी ः सुमारे ५० लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने आज अटक केली. रमेश परमार आणि सराफतअली खान अशी दोघांची नावे आहे. दोघांकडून पोलिसांनी २५५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे. दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी संतोषनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २५५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे ५० लाख आहे.
--
बेकायदा बांधकाम विरोधात ‘भीक मांगो’
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट आहे. बेकायदा बांधकामांबरोबर शहरात सुरू असलेल्या काही बेकायदा धर्मस्थळांनाही अधिकारी पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत गेल्या तीन वर्षांपासून ९०० दिवस पालिकेच्या विरोधात मोहीम उघडणारे निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी गुरुवारी पुन्हा मानपाडा रस्त्यावर ‘भीक मांगो’ आंदोलन केले. बेकायदा बांधकामात घर घेऊन अनेक ग्राहकांची फसवणूक होत असतानाही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
---
मूलभूत सुविधांसाठी नागरिकाचे आंदोलन
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी वाया घालविला आहे. परंतु मूलभूत सोईसुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत, पालिका मुख्यालयासमोर दक्ष नागरीक संगम डोंगरे यांनी गुरुवारी भिक मागो आंदोलन केले. शहर हे स्मार्टसिटीच्या दिशेने जात असतांना शहराच्या मूलभूत सोईसुविधांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे महापालिका सांगत आहे. महापालिका रस्ते असतील, शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे. परंतु उद्यानाची दुरावस्था झालेली असतांना त्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com