
दहावी निकाल
पान १ साठी
०६५१३
कोकण मंडळाचा राज्यात डंका
दहावीचा निकाल ९८.११ टक्के; मुली अव्वल, सवलतीच्या गुणांमुळे अनेकांना १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : सलग ११ व्या वर्षी राज्यात कोकण विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. कोकण मंडळाचा निकाल ९८.११ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला. शासन निर्णयानुसार कला, क्रीडा, एनसीसी व स्काउट, गाईड क्षेत्रात सहभाग, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळाले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवण्याची किमया साधली.
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण, सर्वोत्तम- ५ च्या निकषानुसार एकूण गुण व टक्केवारी दिली. विद्यार्थ्यांना १४ जून रोजी दुपारी ३ वाजता माध्यमिक शाळांमार्फत गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. निकाल अगदी वेळेत लागल्यामुळे आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची लगबग सुरू झाली आहे. कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय अध्यक्ष डॉ. माधुरी सावरकर आणि प्र. विभागीय सचिव भावना राजनोर यांनी पत्राद्वारे निकाल जाहीर केला. गतवर्षी मंडळाचा निकाल ९९.२७ टक्के लागला व यंदा ९८.११ टक्के लागला. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत मंडळाच्या निकालात १.१६ टक्के घट झाली आहे.
मार्च- एप्रिल २०२२ मध्ये रत्नागिरीत १ गैरमार्ग प्रकरण आढळले होते. यंदाच्या परीक्षेत २ गैरमार्ग प्रकरणे उघडकीस आली. मंडळात एकूण ६४४ शाळांसाठी ११४ परीक्षा केंद्रे होती. रत्नागिरी जिल्ह्यात ४१५ शाळांसाठी ७३ परीक्षा केंद्रे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२९ शाळांसाठी ४१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.५६ व मुलींची ९८.७० टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १.१४ टक्के जास्त आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मंडळाचा निकाल ७३.६४ टक्के लागला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ३३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, ३२४ परीक्षेस बसले व २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२६ जणांनी नोंदणी केली, १२० बसले व ८९ उत्तीर्ण झाले. उत्तरपत्रिकांची छायाप्रत, गुणपडताळणीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय करता येईल. गुणपडताळणीसाठी ३ ते १२ जूनपर्यंत व छायाप्रतीसाठी ३ ते २२ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
चौकट १
जिल्हा नोंदणी प्रविष्ट उत्तीर्णतेची टक्केवारी
रत्नागिरी १८८४० १८८०१ १८४०७ ९७.९०
सिंधुदुर्ग ९१३१ ९१२२ ८९८९ ९८.५४
---------------------------------
एकूण २७९७१ २७९२३ २७३९६ ९८.११
---------------
चौकट २
जिल्हानिहाय मुले-मुलींची माहिती
जिल्हा प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी
रत्नागिरी मुले ९७६५ ९५०८ ९७.३६
मुली ९०३६ ८८९९ ९८.४८
सिंधुदुर्ग मुले ४७३० ४६३४ ९७.९७
मुली ४३९२ ४३५५ ९९.१५