
खेड-हुंबरी - महाळुंगेत अवैध वाळू उपसा
हुंबरी-महाळुंगेत अवैध वाळू उपसा
खेड, ता. २ : तालुक्यातील खालची हुंबरी व महाळुंगे गावांच्या परिसरात जगबुडी नदीपात्रात जेसीबी व डंपरच्या साह्याने अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल विभागाला कळवूनही तलाठी, मंडल अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सह्याद्रीच्या रांगेतील जगबुडी नदीचे पात्र काही दिवसांतच कोरडे पडल्यानंतर येथे नदीने पावसाळ्यात वाहून आणलेल्या वाळूचा साठा उपसून लाखो रुपये कमविण्यासाठी वाळू माफिया सज्ज होतात. जेसीबी व डंपरसारखे साधन वापरून या वाळूचा थेट नदीपात्रातून उपसा केला जातो. नदी पुढे खाडी किनाऱ्याकडे जशी वाहू लागते तेथे हातपाटी, सक्शन मड पंप व ड्रेझर यांचा वापर करून दररोज लाखो रुपयांची वाळू चोरी केली जाते. यावर्षी देखील सह्याद्रीच्या दुर्गम भागात हुंबरी-महाळुंगे परिसरात जगबुडी नदीत अवैध वाळू उपसा तेजीत असून या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा गौण खनिज अधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.