‘एसपीके’ला स्वायत्त महाविद्यालय दर्जा

‘एसपीके’ला स्वायत्त महाविद्यालय दर्जा

06754
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना खेमसावंत-भोसले. शेजारी युवराज लखमसावंत-भोसले आदी.

‘एसपीके’ला स्वायत्त महाविद्यालय दर्जा

जिल्ह्यात पहिल्यांदाच; अभ्यासक्रमात २० टक्केपर्यंत बदलाची मुभा

सावंतवाडी, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी हे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले स्वायत्त महाविद्यालय असून, यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये परिसरातील गरजेनुसार २० टक्क्यांपर्यंत बदल केला जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा पद्धतीमध्येही बदल केला जाणार आहे. यासाठी स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरासाठी व जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विषय अभ्यासक्रमामध्ये घातले जाणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष राजे खेमसावंत-भोसले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येथील महाविद्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्ष शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत-भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. राजेसाहेब खेमसावंत-भोसले म्हणाले, ‘‘स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून आसपासच्या परिसरासाठी व जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले विषय अभ्यासक्रमामध्ये घेतले जाऊ शकतात. भौतिक गरजांचा विचार, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, रोजगाराच्या नवीन संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले जातील. यामुळे ‘मेक इन इंडिया’साठी याचा निश्चितच हातभार लागेल. परीक्षेचे निकाल वेळेवर लागतील व विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चितच फायदा होईल. महाराष्ट्रामध्ये ४५०० महाविद्यालये आहेत. यामध्ये ९५ महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच मुंबई विद्यापीठामध्ये ३६ महाविद्यालये स्वायत्त दर्जा प्राप्त झालेली आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या शंभर महाविद्यालयांमध्ये ‘एसपीके’चा सहभाग झाला आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये पहिल्या ४० महाविद्यालयांमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयास हा दर्जा प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नोकरीच्या संधी उपलब्ध होणे, सर्टिफिकेट कोर्सेस व अनुभवावर आधारित शिक्षण या माध्यमातून विद्यार्थ्यांना यामध्ये अनेक संधी प्राप्त होतील.’’
---
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी
संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत-भोसले, कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे, युवराज्ञी श्रद्धाराजे, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत आदींच्या प्रयत्नामुळे महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होणार आहेत, असे यावेळी प्रा. डॉ. डी. एल. भारमल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com