रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रम
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रम

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रम

sakal_logo
By

रत्नागिरीत बुद्धिबळ विकास कार्यक्रम राबवणार
विविध गटांतील बुद्धिबळ स्पर्धा; गुणवान बुद्धिबळपटूंना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन मिळावे व बुद्धिबळाचा प्रसार होण्याकरिता येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे बुद्धिबळ विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. बुद्धिबळप्रेमींना खेळाचा आनंद लुटता यावा, भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळपटू आपल्या जिल्ह्यातून घडावेत या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील किमान पाच वर्षे तरी हा विकास कार्यक्रम सातत्याने राबवला जाईल, अशी आखणी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या स्पर्धा रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती अॅकॅडमीतर्फे देण्यात आली.
बुद्धिबळात काही मोजके अपवाद वगळले तर स्थानिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धा या एकदिवसीय जलद बुद्धिबळ या प्रकारच्या असतात. या सतत होणाऱ्या एकदिवसीय जलद स्पर्धांमध्ये डाव खेळताना विचार करायला वेळ कमी पडतो. नवोदित तसेच प्रगती करू इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूंना विचार करून खेळायला अधिक वेळ मिळावा, व्यवस्थित विचार करून खेळायची सवय लागावी या उद्देशाने या विकास कार्यक्रमांतर्गत विविध क्लासिकल स्वरूपाच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जाणार आहे. यात तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, फक्त महिलांकरिता, फक्त फिडे मानांकन प्राप्त व फक्त बिगर मानांकन खेळाडूंसाठी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या शिवाय २५ वर्षांखालील, २१ वर्षे, १७ वर्षे व १३ वर्षे वयोगटातील स्पर्धादेखील होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना जिल्ह्याबाहेरील नामांकित खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळावी या हेतूने निमंत्रितांची स्पर्धा तसेच प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
क्लासिकल फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी अधिक दिवस लागतात. या स्पर्धा खेळायला आर्थिक खर्च खूप होतो व सर्वांनाच परवडतो असे नाही. वरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील मोजक्या गुणवान खेळाडूंना बाहेरगावच्या क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धा खेळण्यासाठीचा आर्थिक हातभार या विकास कार्यक्रमांतर्गत लावण्यात येईल. कार्यक्रमासाठी अॅकॅडमीचे प्रमुख चैतन्य भिडे, प्रा. मंगेश मोडक व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांनी पुढाकार घेतला आहे.

चौकट
दिलीप टिकेकर स्मृती बुद्धिबळ वाचनालय
रत्नागिरीमध्ये बुद्धिबळाचे बीज रूजवण्यात व बुद्धिबळाचा प्रसार करण्यात ज्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सिंहाचा वाटा उचलला, असे (कै.) दिलीप श्रीपाद टिकेकर यांच्या स्मरणार्थ बुद्धिबळाच्या साहित्याचे वाचनालय येथे चालू करण्यात येणार आहे. (कै.) टिकेकर यांनी संग्रहित केलेल्या बुद्धिबळावरील अनेक पुस्तकांचा व दुर्मिळ मॅगझिन्सचा आस्वाद बुद्धिबळप्रेमींना घेता येईल. जिल्ह्यातील खेळाडूंनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन अॅकॅडमीने केले आहे.