
पिरंदवणे येथील त्या घरकुलाच्या बांधणीचा मार्ग अखेर मोकळा
पिरंदवणेतील घरकुलाच्या बांधणीचा मार्ग मोकळा
स्थगिती आदेश रद्द ; महिलेच्या आक्रोशानंतर निर्णय
साखरपा, ता. ३ः पिरंदवणे (ता. संगमेश्वर) येथील घरकूल लाभार्थी सदानंद गुरव यांच्या घरकूल बांधणीबाबत देण्यात आलेला स्थगिती आदेश अखेर पंचायत समितीकडून रद्द केला आहे. त्यामुळे या घरकूल बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
पिरंदवणे येथील गाजत असलेल्या घरकूल स्थगितीबाबत लाभार्थ्यांच्यावतीने गटविकास अधिकारी भरत चौगुले यांची भेट घेऊन त्यांना सद्यःपरिस्थिती सांगितली. त्या वेळी लाभार्थी सदानंद गुरव यांचे कुटुंब पावसाळ्याच्या तोंडावर बेघर होण्याची वेळ आल्याचे सांगून एकतर घरकुलावर आणलेली स्थगिती उठवा अन्यथा कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करा, अशी विनंती केली.
त्यानुसार जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय देऊ असे आश्वासन गटविकास अधिकारी चौगुले यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी गटविकास अधिकार्यांची भेट घेण्यात आली. त्या वेळी चौगुले यांनी लाभार्थी सदानंद गुरव यांच्या घरकुलाच्या कामावर आणलेल्या स्थगितीचे पत्र रद्द करण्यात आल्याचे सांगितले. हे पत्र रद्द करावे अशा आशयाचा लेखी आदेश गटविकास अधिकाऱ्यांना पिरंदवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना काढला आहे. त्या आदेशामुळे गुरव यांच्या घरकुलाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चौथऱ्यापर्यंत बांधून स्थगित झालेल्या घरकुलाच्या पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व प्रकरणांबाबत सदानंद गुरव यांच्यावतीने वैदेही गुरव यांनी प्रशासनाचे आणि गटविकास अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
----------
कोट
गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. मुळातच जे घरकूल नियमांनुसार मंजूर झाले होते. त्याच्यावर स्थगिती आणून लाभार्थ्यावर अन्याय झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची बाजू समजून न्याय दिला.
- वैदेही गुरव, पिरंदवणे