जाहिरात पूरवणीचा लेख

जाहिरात पूरवणीचा लेख

(डोकं - जागतिक पर्यावरण दिन विशेष)

rat4p6.jpg ः KOP23M06965 - आलेख

इंट्रो

जागतिक तापमानवाढ हा सध्या जगभरात चर्चिला जाणारा कळीचा मुद्दा आहे. शास्त्रीय नियतकालिकांपासून ते ‘यंदा फारच उकडतंय’ अशा घरगुती चर्चांपर्यंत याचे पडसाद आपल्याला दिसून येतात. जिकडेतिकडे अशा चर्चा होत असूनसुद्धा त्याकडे आपण किती लक्ष देतो? किंबहुना जागतिक तापमानवाढीच्या समस्येची तीव्रता खरंच आपल्याला कळली आहे का? आपणही याला कारणीभूत किती आहोत, याचा विचार आजच्या पर्यावरणदिनाच्या निमित्ताने व्हायला हवा, अशी भूमिका मांडणारा हा लेख .........

- भाऊ काटदरे, सोहम घोरपडे, चिपळूण
---
जागतिक तापमानवाढीला आपणही कारणीभूत

सनमध्ये स्वीडिश संशोधक ‘स्वांते अर्हेनियस’ यांनी जागतिक तापमानवाढ हा विषय सर्वप्रथम जगासमोर मांडला. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे सरासरी तापमान सुमारे 15 अंश सेल्सियसइतके असते; मात्र औद्योगिक क्रांतीनंतर हळूहळू वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण वाढू लागले. यामुळे हरितगृह परिणामाची तीव्रता वाढून सरासरी तापमानात वाढ झाली आणि मग विविध पर्यावरणीय प्रश्नांची सुरवात झाली. तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वितळणे, समुद्राच्या पातळीत वाढ, ऋतुमानात बदल अशा अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. या पर्यावरणीय असमतोलाचा फटका जगभरातील विविध अधिवासांना बसला. तापमानातील तीव्र चढ-उतार, हिमनद्या वितळणे, वाळवंटी भागात पाऊस पडल्याने वारंवार येणाऱ्या टोळधाडी अशा अनेक समस्या विविध भूप्रदेशात निर्माण झाल्या. वातावरणातील बदलांमुळे पावसाची तीव्रता आणि कालावधी सतत बदलत आहे. शेती आणि शेतीपूरक उद्योगांना याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. भूस्खलन आणि हिमस्खलन होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दशकांपासून कोकणात वारंवार येणारी वादळे, पूर आणि भूस्खलन हा याचाच एक भाग आहे.
जागतिक तापमानवाढीची करणे शोधायला गेलो तर उद्योगधंदे, वाहतूक, शेती आणि वाढती लोकसंख्या ही प्रमुख कारणे आहेत. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसतसे माणसांच्या राहणीमानात बदल होत गेले. लोकसंख्या झपाट्याने वाढली. मनुष्यबळ आणि प्राण्यांचा वापर करून केली जाणारी कामे आता खनिज तेल आणि विद्युत ऊर्जेच्या जोरावर केली जाऊ लागली. यातून ऊर्जेचा बेसुमार वापर होऊ लागला आणि या ऊर्जेच्या निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधने ओरबाडली जाऊ लागली. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वाट्टेल तिथे प्लास्टिकचा वापर करून वस्तू बनवल्या जाऊ लागल्या. प्लास्टिकमुळे नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी होण्याऐवजी नवीन प्रश्न निर्माण झाले. या सर्व समस्या एकमेकांशी निगडित असल्याने जागतिक तापमानवाढीचा प्रश्न आणखी जटिल होऊन आपल्यासमोर उभा ठाकला आहे.
आपण करत असलेल्या सर्व कामांतून निर्माण होणार्‍या एकूण हरितगृह वायूंचे प्रमाण मोजण्यासाठी कार्बन फूटप्रिंट (कार्बन पदभार) या संकल्पनेचा वापर केला जातो. कार्बन फूटप्रिंट हे एकूण उत्सर्जित कर्बवायूंचे प्रमाण मोजण्याचे एकक आहे. जितका जास्त संसाधनाचा वापर, जितकी जास्त ऊर्जा खर्च होते तितकी जास्त कार्बन फूटप्रिंट. दैनंदिन जीवनात आपण निर्माण करत असलेल्या कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण मोजण्यासाठी अनेक अॅप आणि वेबसाईट उपलब्ध आहेत. आजमितीस भारतीय नागरिकांचा सरासरी कार्बन फूटप्रिंट 1.9 मेट्रिक टन/ प्रतिवर्ष इतका आहे. तापमानवाढीचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर हे प्रमाण लवकरात लवकर कमी करणे अपरिहार्य आहे. सध्या ऑनलाईन खरेदीचा काळ आहे. घरगुती वापराच्या छोट्या-मोठ्या वस्तूंपासून मोठ्या यंत्रांपर्यंत सारे काही एका क्लिकवर घरबसल्या मिळते. त्यामुळे व्यापाराला जरी चालना मिळत असली तरी यातून होणाऱ्या प्रदुषणाचे काय? जगाच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकावर जेव्हा एखादी वस्तू पोहोचवली जाते तेव्हा त्यासाठी वारेमाप खर्च झालेले इंधन, प्रदूषण आणि पर्यावरणीय ताण याचा आपण विचारच करत नाही. या प्रकारच्या व्यापारामध्ये वस्तू बनवल्यानांतर त्याच्या जाहिरात आणि वाहतुकीवर अनावश्यक पैसा, इंधन आणि संसाधने खर्च होत आहेत. या अनावश्यक स्पर्धेतून पर्यावरणावर प्रचंड ताण येत आहे. या स्पर्धेमुळे कमीत कमी खर्चात उत्पादन करताना संसाधनांची नासाडी, प्रदूषण आणि जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. यातील प्रचंड आर्थिक फायद्यामुळे सरकारेदेखील मूग गिळून गप्प बसलेली दिसून येतात.
तापमानवाढ हा जागतिक प्रश्न असला तरी त्यासाठी प्रयत्न स्थानिक पातळीवरूनच किंबहुना आपल्या घरापासूनच सुरू झाले पाहिजेत. यासाठी ‘थिंक ग्लोबल अॅक्ट लोकल’ ही संकल्पना राबवली जात आहे. सरकार, विविध संस्था यांच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना नागरिकांची साथ असेल तरच अशा संकल्पना यशस्वी होऊ शकतात. जागतिक तापमानवाढ रोखायची असेल तर आपण आपल्या घरातून सुरवात केली पाहिजे. यासाठी शाश्वत जीवनशैली स्वीकारणे, हा एक उत्तम मार्ग आहे.
शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपण बऱ्याच सहजसोप्या गोष्टींचा अवलंब करू शकतो, नव्हे केलाच पाहिजे. आज प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असले तरी त्यासाठी रिड्यूस, रीयुज, रिसायकल या पद्धतींचा वापर केलाच पाहिजे. अनावश्यक ठिकाणी प्लास्टिकचा वापर टाळणे नक्कीच आपल्या हातात आहे. बेसुमार ऊर्जेचा वापर टाळण्यासाठी उत्तम दर्जाची उपकरणे वापरणे, त्यांचा वापर गरजेपुरताच करणे आपल्याला नक्कीच जमू शकेल. सरसकट ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा शक्य तितक्या वस्तू स्थानिक बाजारातून खरेदी केल्या पाहिजेत. दैनंदिन जीवनात आपण ज्या गोष्टी करतो त्यांचा पर्यावरणावर काय परिणाम होत असेल याचा विचार करून मग कृती केल्यास जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी मोठा हातभार लागू शकेल.
या सगळ्या पर्यावरणीय समस्यांच्या ढगाला एक सोनेरी किनारदेखील आहे. दिवसेंदिवस नागरिक पर्यावरणीय समस्यांबाबत जागरूक होत आहेत. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या गोष्टींना विरोध होत आहे. प्लास्टिक कचरामुक्ती, जंगलांची पुनर्निर्मिती आणि शाश्वत जीवनशैली यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवल्या जात आहेत. कोळसा आणि खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा वापर हळूहळू वाढत आहे. यासाठी जगभरातील सरकार पुढाकार घेत आहेत. भारताने 2070 पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. यासाठी पुढाकार घेऊन सोलर पार्क आणि मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट्स उभारण्याचे काम हाती घेतले आहे. 2023च्या पहिल्या तिमाहीत 2900 कोटी युनिटइतके सौरविद्युत उत्पादन भारतात झाले आहे. नागरिकांनी घरगुती स्तरावर सौरविद्युत प्रणाली बसवावी यासाठी विशेष योजना सुरू करण्यात आल्या आहेत. विद्युत ऊर्जेवर चालणार्‍या वाहनांचा वापर वाढावा यासाठी अनुदानदेखील मिळत आहे. येणाऱ्या काळात अॅल्युमिनिअम बॅटरी आणि हायड्रोजन इंधनावर चालणार्‍या वाहनांचा वापर वाढल्यास आणखी कार्बन उत्सर्जन कमी होईल.
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जगभरात सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत; मात्र या सगळ्याचा वेग आणि प्रमाण वाढणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्कीच जागतिक तापमानवाढीला आळा घालू शकू.

(लेखक सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण या संस्थेत कार्यरत आहेत)

चौकट-1
-----
तापमानवाढीची कारणे

* वाढती लोकसंख्या
* उपभोगवादी जीवनशैली
* यांत्रिकीकरण
* वाहतूक
* शेती आणि शेतीपूरक उद्योग
* वणवे आणि ज्वालामुखी

चौकट-2
-----
तापमानवाढ रोखण्यासाठी हे करा

* प्लास्टिकचा वापर जबाबदारीने करा
* वृक्ष लागवड अभियानांमध्ये सहभागी व्हा
* वि‍जेचा वापर कमी करा
* तुमचा कार्बन फूटप्रिंट मोजा
* कार्बन फूटप्रिंट कमी करा
* सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करा
* पर्यावरणीय प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com