
राजापूर -इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापुरातील 48 गावे
इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापुरातील ४८ गावे
पश्चिम घाट ; विकासात अटी, शर्थीचे अडथळे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः केंद्र शासनाने निश्चित केलेल्या इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसलेली असताना त्यामध्ये आता इकोसेन्सिटिव्ह झोनचा फटका बसणार आहे. या झोनमधील अटी आणि शर्थी राजापूर शहरासह ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे.
पश्चिम घाट संवर्धनांतर्गत केंद्र शासनाच्या विविध समित्यांनी काही परिसंवेदनशील क्षेत्र म्हणजे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये काही भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये येथील राजापूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील झर्ये, वाटूळ, येरडव, कोंडदसूर, परूळे, चिखले, कोंडसरखुर्द, पांगरीखुर्द, तिवरे, धामणपे, हरळ, वरची गुरववाडी, कोतापूर, कोळवणखडी, सौंदळ, खिणगिणी, केळवडे, पाथर्डे, पाचल, आगरेवाडी, भराडे, करक, हर्डी, गोठणेदोनिवडे, ओशिवळे, वाळवड, काजिर्डा, फुपेरे, राजापूर (म्युन्सिपल), कोळंब, पहिलीवाडी ताम्हाणे, जांभवली, मिळंद, बाग काझी हुसेन, हसोळ सौंदळ, पांगरीबुद्रुक, सावडाव, हातदे, डोंगर, मोसम, महाळुंगे, पन्हळेतर्फ सौंदळ, शेजवली, वाल्ये, बांदिवडे, प्रिंदावण, कुंभवडे, पाल्ये अशा ४८ गावांचा समावेश आहे.
समुद्रकिनारा ते घाटपरिसर अशा विस्तारलेल्या राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा म्हणावा तसा अद्यापही विकास झालेला नाही. अनेक गावांना जोडणार्या दर्जेदार रस्त्यांची प्रतीक्षा असून अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज पोहोचलेली नाही. त्यामुळे अशी गावे डिजिटलच्या दुनियेपासून अद्यापही लांब आहेत. राजापूर शहराच्या विकासालाही विविध कारणांमुळे खीळ बसली आहे. त्यामध्ये गावठाण, देवस्थान, इनाम मिळकती, पूररेषा आदींचा समावेश आहे. त्याचवेळी उतार परिसरामध्ये विस्तारलेले आणि खोलगट भाग अशी शहराची असलेली विचित्र भौगोलिक रचनाही शहर विकासामध्ये अडचणीचे ठरत आहे. अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागासह शहराला विकास करताना नव्याने इकोसेन्सिटिव्ह झोनच्या अटी आणि शर्थींना सामोरे जावे लागणार आहे.