पटसंख्या वाढवण्यात सरकारी शाळा मागे

पटसंख्या वाढवण्यात सरकारी शाळा मागे

पटसंख्या वाढवण्यात सरकारी शाळा मंदगती
चिपळूणातील स्थिती ; नर्सरीचे शिक्षकही दारोदारी
चिपळूण, ता. ४ ः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झालेले नाहीत. शिक्षक टिकवण्यासाठी पूर्वीसारखे प्रयत्न होत नाहीत. खासगी शाळा मात्र पटसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याची दाट शक्यता आहे.
खासगी शाळांमध्ये जानेवारी महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होते. जिल्हा परिषद शाळेत जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते. ज्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळत नाही, असे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतात. चिपळूण तालु्क्यात एकूण ३२५ शाळा आहेत. यातील १८ शाळा उर्दु माध्यमच्या आहेत. १५ हजार विद्यार्थी तालु्क्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. तालुक्यात शाळाबाहेय विद्यार्थी नाहीत. पावसाळा संपल्यानंतर जे परजिल्ह्यातील मजूर मुलांना घेवून येतात, त्याना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो.
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एप्रिल महिन्यात प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी तसा कोणताही उपक्रम राबवण्यात आलेला नाही. घटती पटसंख्या लक्षात घेवून उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पटसंख्या वाढवण्याचे काम करत होते. यावर्षी तसे प्रयत्न होताना दिसत नाही. खासगी संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी ‘पटनोंदणी आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येत आहे.
बालवाडी सेविका, शिक्षक गावात, वस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. शिक्षक पालकांची भेट घेऊन त्यांना शाळेविषयी आणि शाळेत दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी माहिती देत आहेत. त्यांचे प्रबोधन सुरू आहे. तसेच सुटी असूनही रोज दोन तास शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून पालक प्रवेश घेण्यासाठी आल्यास त्यांना विनाअडचण प्रवेश घेता येईल. खासगी नर्सरीतील शिक्षिका जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन त्यांना इंग्रजी माध्यमच्या नर्सरीमध्ये घेण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे मातृभाषेतील शिक्षणाचा पायाच कमकुवत केला जात आहे.

कोट

जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची प्रसिद्धी किंवा गाजावाजा केला जात नाही. जिल्ह्यातील काही विद्यार्थी नासाला जाऊन आले. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी असे चांगले उपक्रम हाती घेतले जात आहेत.
- राज अहमद देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com