
डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर पुन्हा जनतेच्या सेवेत
07052
डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर
डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर
पुन्हा जनतेच्या सेवेत
कोकण संस्थेचा पुढाकार; दर बुधवारी सावंतवाडीत
बांदा, ता. ४ ः सावंतवाडीचे सेवाभावी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे निवृत्तीनंतरही जनतेच्या प्रेमाखातर सेवेसाठी पुन्हा रुजू होणार आहेत. यासाठी पुढाकार घेतलेल्या कोकण संस्थेच्या माध्यमातून ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानणारे डॉ. दुर्भाटकर हे सावंतवाडी शहरात दर बुधवारी केवळ १ रुपया बिदागी घेऊन लवकरच सेवेत दाखल होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली.
श्री. कुबल म्हणाले, ‘‘बांद्यातील जनतेच्या सेवेसाठी ७० ते ८० च्या दशकात केवळ १ रुपये फी घेऊन कार्यरत असलेले (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ. दुर्भाटकर यांनी घेतलेल्या निर्णयाने त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीचा गुण दृष्टीस पडतो. डॉ. दुर्भाटकर यांच्या निरोपप्रसंगी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असलेला व्हिडिओ पाहिला होता. ते सरकारी नोकरीतून नियमाप्रमाणे मुक्त झालेत, निवृत्त झालेले नाहीत. त्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी, मी कधी निवृत्त होऊच शकत नाही, पुष्पगुच्छापेक्षा माझ्या कर्तव्य अंमलबजावणीत साथ द्या, असे सांगितले. त्यानंतर आम्ही ‘वन रुपी क्लिनिक’ची संकल्पना मांडली, त्यावेळी त्यांनी तात्काळ होकार दिला. केवळ एक रुपयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो स्त्रियांना रोगमुक्त होण्यास मदत करायची आहे, एक रुपया का? मोफत का नाही, असे त्यांनी विचारले. कोणाच्याही स्वाभिमानाला ठेच पोचू नये म्हणून एक रुपया त्यांनी घेण्याचे मान्य केले. आठवड्याला दर बुधवारी जुना शिरोडा नाक्यावर दुर्वांकुर सोसायटीच्या ६ नंबर गाळ्यात डॉ. दुर्भाटकर यांचे सेवेचे व्रत अविरत चालू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दुर्भाटकर हे गरजू स्त्रियांची दर बुधवारी एक रुपयात चिकित्सा करणार आहेत. जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा. भविष्यात बांदा शहरातही ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्याचा मानस आहे.’’