
शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा
07189
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा प्रशासनास निवेदन देताना आंबा बागायतदार शेतकरी.
शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा
आंबा बागायतदारांची मागणी; निवडणुकांवर बहिष्कारासह आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेमधील लाभार्थी तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जदार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यांना तात्काळ कर्जमुक्तीचा लाभ द्या; अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यातील आंबा, काजू व भात पीक उत्पादक शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कर्जमाफीबाबत लक्ष वेधले. यावेळी शेतकरी अर्जुन नाईक, आग्नेल फर्नांडिस, श्यामसुंदर राय, जगन्नाथ गावकर आदी शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, म्हणून वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करूनही शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. शासनाने दोन वेळा कर्जमाफीचा लाभ दिला; मात्र दोन्ही कर्जमाफीमध्ये २ लाखांवरील कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. हे शेतकरी थकीत कर्जदार असल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतीपूरक कर्ज घेऊ शकत नाहीत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून कर्जबाजारी झाले आहेत. एका बाजूने शेतकऱ्यांकडे घेतलेल्या कर्जाची सक्तीने वसुली होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना खावटी कर्ज माफी देणे मान्य केले असले तरी त्याचा कालावधी ३१ मार्च २०१६ असा ठेवल्याने बरेच कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे त्याची मुदत शासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढवून द्यावी; अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालून शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून शेतकऱ्यांनी दिला आहे.
...............
चौकट
विम्याची रक्कम ३० पर्यंत द्यावी
जिल्ह्यातील वारंवार होणारा हवामानातील बदल आणि वाढलेले तापमान यामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना २०२२-२३ मधील विमा नुकसान भरपाई ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळावी. चालू वर्षीचा आंबा पीक हंगाम लक्षात घेता शासनाच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना पुढील मशागतीच्या नियोजनासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे. चालू वर्षी आंबा हंगाम धोक्यात गेल्यामुळे आंबा पीक कर्ज व औषध फवारणी यासाठी झालेला खर्च पाहता शेतकरी संकटात सापडला आहेत. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना विमा नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.